Ulhasnagar Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा महायुतीमधील सत्ताधारी मित्रा पक्षांमध्ये कुरघोड्या रंगू लागल्या आहे. महायुतीमध्ये एकप्रकारे समन्वय राहिला नसल्याचे दिसते आहे.
विशेष करून, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील महापालिकेत राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजकीय कुरघोड्या रंगू लागल्या आहे. उल्हासनगर महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजकीय कुरघोडी केल्याने महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने कलानींपाठोपाठ स्थानिक साई पक्षापुढेही दोस्तीचा हात केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाबरोबर दोस्तीचा हात पुढे जोरदार बैठक घेतली. ही बैठक उल्हासनगरमधील एका मोठ्या हाॅटेलमध्ये झाली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि साई पक्षाच्या या बैठकीमुळे दोन्ही पक्षांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.
या युतीमुळे मराठी आणि सिंधी मतांचे ध्रुवीकरण करून भाजपवर (BJP) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुरघोडी केल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप देखील आता रणनीती आखण्यात गुंतलं असून, योग्य संधीची वाट पाहात आहे.
उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने मध्यंतरी जोरात पक्ष प्रवेश घडवून आणले. कलानी भाजपसोबत जाणार की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार याची चर्चा सुरू असताना, कलानी समर्थक काही माजी नगरसेवकांना भाजप पक्षात प्रवेश केला. यामुळे कलानी यांचे राजकीय टेन्शन वाढले होते.
परंतु ओमी कलानी यांनी भाजपऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत दोस्तीचा हात पुढे करून, एकत्र निवडणूक लढविण्याच्या आणाभाका घेतल्या. त्याच वेळी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन युतीकरिता सकारात्मक प्रतिसाद दिला. खासदार शिंदे यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक झाल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर, ओमी कलानी, जीवन इदनानी, माजी महापौर आशा इदनानी, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण, राजेंद्रसिंग भुल्लर, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन, दिलीप गायकवाड आदी या बैठकीला उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.