Anurag Thakur Sarkarnama
मुंबई

Anurag Thakur Mumbai Visit: मुंबईसाठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'; अमित शाहांनंतर अनुराग ठाकूर घेणार मतदारसंघाचा आढावा

Ganesh Thombare

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने तर महाराष्ट्रात 'मिशन 45' अंतर्गत आगामी रणनीतीदेखील आखली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीनंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुंबईत आढावा घेणार आहेत.

मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष आहे. अनुराग ठाकूर यांनी मुंबईतील दादर येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते स्वत: सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. तसेच भाजपच्या ताब्यात नसलेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांवरदेखील भाजपने लक्ष घातले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शाह यांनी तब्बल ४५ मिनिटं चर्चा केली होती. या वेळी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घेत त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका याविषयी चर्चा केली होती.

तर काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत राज्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले होते. तसेच भाजपने राज्यभरात मतदारसंघनिहाय समन्वयक नेमले आहेत. त्यांच्यावर त्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

चार राज्यांतील भाजपच्या तब्बल 350 आमदारांना भोपाळमध्ये विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या 40 आमदारांचा समावेश होता. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मंत्री ठाकूर पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT