सिंधुदुर्ग : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन बुधवारी मंजूर करण्यात आला. मुलाला मोठा दिलासा मिळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले, असं सूचक वक्तव्य त्यांनी केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी गुरूवारी मुंबईचा दादा शिवसेनाच असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दुपारी नितेश राणे यांना जामीन मिळाला. यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चा रंगल्या आहेत. 'संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत,' असा इशारा राणे यांनी दिला आहे.
तुमची जागा बाहेर नाही आता “आत”. तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही, असं सूचक वक्तव्यही राणे यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तियांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. राऊतांनी याबाबत उपराष्ट्रपतींना पत्र लिहित ईडीवर गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान, नितेश राणे यांना जामीन मिळाल्यानंतर बंधू निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले होते की, नितेश राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा आनंद आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया होती. त्यात आज जामीन मिळाला आहे. काय काय घडले हे बोलायची वेळ आज नाही. आज आनंदाचा दिवस आहे. हिंदीत म्हण आहे की, 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही' आज त्याचा नेमका अर्थ कळाला आहे. प्रशासनावर दबाव होता की नाही हे बोलायची आज वेळ नाही. जेव्हा ते बाहेर काढायचे तेव्हा बाहेर काढू, असं सूचक वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे.
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता.8) जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. पण न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने निकाल राखून ठेवण्यात आला होता. बुधवारी त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राणेंचा 30 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला आहे. सरकार पक्षाकडून जामीन अर्ज फेटाळण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती.
काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.