Mumbai Police News मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकाच्या निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचसंदर्भातील बातमीचा फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य केले आहे.
जुलै महिन्यापासून शिंदेंबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यासाठी निर्भया निधीअंतर्गत मिळालेल्या पैशांमधून विकत घेतलेली वाहने वापरील जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलेच घेरले आहे.
जून महिन्यात मुंबई पोलिसांनी २२० बुलेरो, ३५ एर्टीगा, ३१३ पल्सर बाईक्स व २०० अॅक्टीव्हा गाड्या विकत घेतल्या होत्या. निर्भया फंडाअंतर्गत मिळालेल्या ३० कोटी रुपयांमधून या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. २०१३ मध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी ही योजना सुरु केली होती. त्याअंतर्गतच पोलीस दलाला वाहनखरेदीसाठी हा ३० कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीमधून देण्यात आलेल्या गाड्यांची नवी तुकडी जुलै महिन्यामध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झाली होती.
शिवसेनेतुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडले. त्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जात असल्याने या गाड्यांपैकी ४७ बुलेरो गाड्या व्हिआयपी सुरक्षा विभागाने मागवून घेतल्या आहेत. या गाड्यांपैकी १७ गाड्या परत करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही महिला सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापल्या जात आहेत.
मुंबईतील पोलिस स्थानकांना या गाड्या गस्त घालण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या गाड्या नंतर परत मागवण्यात आल्या, त्यावरुन जयंत पाटील यांनी ट्वीट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले ''निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र, खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे.
''एकीकडे मा. मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्या सोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे?'' 'निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते.' अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सुनावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.