Dilip Walse Patil sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर वळसे पाटलांनी भोंग्यांबाबत घेतला मोठा निर्णय

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत तीन तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत तीन तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तसे न झाल्यास प्रत्येक मशिदीसमोर भोंग्यांवरून हनुमान चाळिसा लावणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून पुढील काही दिवसांत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.

रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये झालेल्या वादातून देशातील अनेक राज्यांमध्ये दंगली उसळल्या होत्या. महाराष्ट्र (Maharashtra) त्याला अपवाद ठरला आहे. पण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती राज्य सरकारला आहे. त्यातूनच येत्या तीन तारखेला काही कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्याचपार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली जाणार असल्याचे समजते.

गृह खात्याने याबाबत निर्णय घेतला असून सर्व जिल्हा व शहर पोलिसांना (Police) याबाबत कळवल्याचे समजते. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी याबाबतचे आदेशही काढले आहे. परवानगी न घेतल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. आदेशाचे पालन न केल्यास तुरूंगावासही होऊ शकतो. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार हे महत्वाचे आहे.

गृहमंत्र्यांची तातडीची बैठक

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची तातडीची बैठक आज बोलावली आहे. भोंग्याच्या निर्णयाबाबत आज मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यानुसार राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधिक्षक, अधिकाऱ्यांना आदेश दिले जाणार आहेत. राजय ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गृह विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

दरम्यान, पुण्यात (Pune) रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पाच जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच महाराष्ट्रदिनी एक मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली. हा धार्मिक विषय नसून सामाजिक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, देशभरातील सर्वांनाच सांगणं आहे की, लोकांना वाटत आहे, भोंग्यांचा हा धार्मिक विषय आहे. पण हा सामाजिक विषय असून त्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. भोंग्यांचा मुस्लिमांसह सर्वांनाच त्रास होतो. त्यामुळे तुम्ही जर पाचवेळा तिथे भोंगे लावले तर आम्हीही दिवसांतून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. तयारीत रहा. तीन तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, या देशातील कायद्यापेक्षा, न्यायव्यवस्थेपक्षा जर धर्म, लाऊडस्पीकर मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT