पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी त्यांनी तारीख सांगितली नव्हती. त्यानंतर शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा केली.
पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. अयोध्येला पाच जून रोजी पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोत जाणार आहे. तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केले आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.
राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधारी शिवसेना व महाविकास आघाडीसमोर आव्हान उभं केलं आहे. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सरसावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दैाऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या या दैाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याचे राऊतांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
त्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत मनसेच्या नेत्यांकडून सतत सांगितलेही जात होते. पण कोरोना व इतर कारणांमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबला होता. अखेर त्यांचा मुहूर्त ठरला आहे. अयोध्येत भव राममंदिर उभारणीचे काम सुरू आहे. तिथे जाऊन हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचे राज ठाकरे यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.