Awadhesh Prasad Meet Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Awadhesh Prasad Meet Uddhav Thackeray : ठाकरेंची भेट घेताच अयोध्येचे खासदार भाजपवर बरसले; म्हणाले, "देशात धर्माच्या आधारावर..."

Jagdish Patil

Mumbai News, 20 July : भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. देशभरात 'चारसो पार'चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर तीनशेचा आकडा देखील गाठता आला नाही. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ अद्याप नाराज आहेत.

देशात एनडीएप्रणित सत्ता भाजपने स्थापन केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ देखील घेतली. मात्र, अद्यापही भाजपच्या मनात एका मतदारसंघातील पराभवाची सल आहे. तो मतदारसंघ म्हणजे अयोध्या. भाजप ज्या राम मंदिराचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्याच अयोध्येत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (Awadhesh Prasad) यांचा विजय झाला. हा निकाल सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा होता. त्यामुळे उत्तर प्रदेशसह देशभर अयोध्या मतदारसंघाचे विजयी उमेदवार आणि खासदार अवेधश प्रसाद चर्चा सुरु आहे. म्हणूनच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अवेधश प्रसाद यांची सोनिया गांधींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती.

अशातच आता देशभरात चर्चेत असणारे अवधेश प्रसाद यांनी आज शनिवारी (ता.20जुलै) रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) त्यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सपाचे आमदार अबू आझमी देखील उपस्थित होते. या भेटीनंतर बोलताना, "या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही." असं म्हणत प्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधला.

अवधेश प्रसाद म्हणाले, "काल उद्धव ठाकरे साहेबांनी अयोध्येतून विजयी झालेल्या उमेदवारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आज मी आणि धर्मेंद्र यादव आणि अब्बू आझमी या सर्वांनी ठाकरेंची भेट घेतली. आमची ही भेट राजकीय बैठक नव्हती. अयोध्येतील लोकांनी मला निवडून दिले, याचा अर्थ आता या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही, तर ते संविधानाच्या आधारे चालेल, इथे आरक्षणाचे राजकारण चालेल आणि जो भारताला मजबूत करण्यासाठी काम करेल, तोच इथे चालेल."

तसंच देशात अनेक प्रश्न आहेत, महागाईचा, करोडो तरुणांच्या नोकऱ्यांचा आणि आमच्या सैन्याच्या सन्मानाचा असे अनेक मुद्दे आहेत. मात्र, देशातील इतर समस्यांकडे लोकांनी लक्ष देऊ नये, यासाठी त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी कावड रस्त्यावर नावाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) फक्त बंधुभाव चालेल, याशिवाय दुसरं काहीही चालणार नाही. भाजपने अयोध्येत सर्व काही गमावलं आहे. त्यावरुन अंदाज लावता येऊ शकतो जनतेने त्यांची कशी साफसफाई केली आहे, अशा शब्दात प्रसाद यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

विशाळगडावर जाणार...

तर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना सपा नेते अबू आझमी यांनी आपण स्वतः परवा विशाळगडाला जाणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले मी विशाळगडावर जाईन, तिथल्या मशिदींवर हल्ले झाले आहेत. हे सरकार काहीच करत नाही. तिछे अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा हिंसाचार म्हणजे राज्य सरकारचं अपयश आहे. कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात संपली आहे, अशा शब्दात त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.

दरम्यान, काल आम्ही यूपीच्या खासदारांचे स्वागत करताना उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील खासदार अवधेश प्रसाद आणि धर्मेंद्र यादव यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे आज मी त्यांना मातोश्रीवर घेऊन आलो होतो, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं आझमी यांनी सांगितलं. तर या भेटीची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट करुन दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT