Trupti Sawant, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Trupti Sawant : राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत मनसेत; राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

Vandre East Constituency: वांद्रे पूर्व मतदारसंघात उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी मैदानात आहेत.

Rajanand More

Mumbai : मुंबई भाजपच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. त्यांना मंगळवारी वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी उमेदवार आहेत. आता सावंतांच्या एन्ट्री हा मतदारसंघ हायप्रोफाईल बनला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रामुख्याने सरदेसाई यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. त्यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष लढल्याने शिवसेनेला फटका बसला होता. पक्षाचे वांद्रे पूर्वचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर झिशान सिद्दीकी निवडून आले होते. यानंतर सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. (MNS)

नारायण राणेंचा पराभव

तृप्ती सावंत यांनी खासदार नारायण राणेंचा 2015 च्या पोटनिवडणुकीत पराबव केला होता. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली होती. या चुरशीच्या लढतीत राणेंचा सुमारे 20 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता.

तृप्ती सावंत यांना पक्षात आणत राज ठाकरेंनी भाजपसह उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेलाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरदेसाई यांच्या विजयासाठी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT