Bahujan Vikas Aghadi (BVA) supporters celebrating the victory of senior corporator Ajiv Patil as the new Mayor of Vasai-Virar City Municipal Corporation after defeating the BJP candidate. Sarkarnama
मुंबई

Vasai Virar Mayor : 'ऑपरेशन लोटस' फसलं! 'शिट्टींच्या' रणनीतीने बलाढ्य 'भाजपचे' डावपेच उधळले; महापौर अन् उपमहापौरपदावरही बाजी

Vasai Virar Mayor : वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. अजीव पाटील यांनी भाजपच्या दर्शना त्रिपाठी यांचा पराभव करत महापौरपद, तर मार्शल लोपीस यांनी उपमहापौरपद पटकावले आहे.

Hrishikesh Nalagune

Vasai Virar Mayor : वसई विरार ममहानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज (मंगळवारी) पार पडली. त्यात बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नगरसेवक अजीव पाटील यांनी भाजपच्या अॅड दर्शना त्रिपाठी यांचा 71 विरुद्ध 44 मतांनी पराभव केला. तर मार्शल लोपीस यांनी भाजपच्या नारायण मांजरेकर यांचा पराभव करून ते उपमहापौर पदी निवडून आले. भाजपचे कथित ऑपरेशन लोटस उधळून लावत मिळविलेल्या या विजयानंतर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी जल्लोष केला.

वसई विरार महानगरपालिकेची 5 वर्षांपासून रखडलेली निवडणूक होऊन यात बहुजन विकास आघाडी पूर्ण बहुमताने निवडून आली होती . आज निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. सभागृहाचे कामकाज नगर सचिव विश्वनाथ तळेकर यांनी पाहिले. निवडणूक होत असलेल्या सभागृहाच्या बाहेर आणि मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सभागृहचे कामकाज सुरू झाल्या नंतर उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली होती. यामध्ये बहुजन विकास आघाडी तर्फे निषाद चोरघे आणि प्रफुल साने यांनी अर्ज मागे घेतल्याने बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि भाजपच्या अॅड दर्शना त्रिपाठी यांच्यात सरळ लढत होऊन अजीव पाटील हे 71 विरुद्ध 44 मतांनी निवडून आले. या निवडीनंतर भाजपकडून जय श्री रामचा जयघोष करण्यात आला तर त्याला बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जय द्वारकाधीश घोषणेने प्रत्युत्तर दिले.

उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजनच्या मार्शल लोपीस यांनी नारायण मांजरेकर पराभव केला. सभागृहात निवडणूक सुरू असताना सभागृहाच्या बाहेर, पालिकेचे पहिले महापौर आणि अजीव पाटील यांचे मोठे बंधू राजीव पाटील, माजी महापौर आणि जेष्ठ नेते नारायण मानकर, माजी उपमहापौर उमेश नाईक लॉबी मध्ये बसून होते. पाटील यांची निवड जाहीर झाल्यानंतर सभागृहात माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासह सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

भाजपचे ऑपरेशन लोटस फेल :

वसई विरार महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये 115 सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी 58 नगरसेवकांची आवश्यकता असताना भाजप पक्षाला केवळ 43 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. तर बहुजन विकास आघाडीला 71 जागा मिळाल्या. तरीही “ऑपरेशन लोटस”च्या नावाखाली समाजमाध्यमांवर दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या गेल्या. तब्बल 15 नगरसेवक कमी असतानाही भाजपने महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व 43 नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले. पण हितेंद्र ठाकूर यांनी मात्र एकाही नगरसेवक अज्ञातस्थळी न हलवता भाजपचे सर्व मनसुबे उधळून लावत महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. अजीव पाटील हे पाटील कुटुंबातील दुसरे महापौर ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे मोठे बंधू राजीव पाटील हे महानगरपालिका स्थापने नंतरचे पहिले महापौर झाले होते. अजीव पाटील हे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT