MP Shrikant Shinde Speech
MP Shrikant Shinde Speech Sarkarnama
मुंबई

Video MP Shrikant Shinde Speech : 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'चा गजर संसदेत घुमला, श्रीकांत शिंदेंनी लोकसभेतलं पहिलंच भाषण गाजवलं

Deepak Kulkarni

New Delhi News : कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेतील राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद पर भाषण केले.या भाषणात त्यांनी चौफेर फटकेबाजी करताना महाराष्ट्रीय कणखर बाण्याची झलक सभागृहात दाखवून दिली.त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय..' च्या जयघोषाने केली. यानंतर खासदारकीची हॅट्रिक केलेल्या डॉ. श्रीकांत शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली.

महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा सुरु आहे. सगळ्यात मोठा उत्सव सुरु आहे. ज्यामध्ये लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला जातात आणि तिथं जाऊन विठुरायांचं दर्शन घेतात.आणि हे माझं भाग्य आहे की,लोकसभेतील माझं पहिलं भाषण आज होत आहे असेही शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले, शिवसेना ही 'एनडीए'ची सगळ्यात जुनी घटक पक्ष राहिली आहे. जसं की 'एलआयसी'चं एक वाक्य आहे. जिंदगी के साथ की और जिंदगी के बाद भी..,तसंच बाळासाहेब ठाकरे असतानाही आणि आता नसतानाही शिवसेना एनडीएच्या सोबत आहे.

खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत.त्यांनी आपल्या लोकसभेतील पहिल्याच भाषणात कल्याण मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.तसेच मोदींच्या नेतृत्वातील कामगिरीचंही कौतुक केले.शिंदे म्हणाले,गेल्या 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली.आणि येत्या 5 वर्षांच्या काळात आणखी चांगले निर्णय,धोरणं ते राबवतील असा विश्वास शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.

पण या निवडणुकीत जनतेने एक संदेश दिला आहे की,काँग्रेस एकटी लढली काय किंवा इंडिया आघाडीत, तरी त्यांना विरोधातच बसायचं आहे.राहुल इथून तिथे गेले आहेत,पण राहुल तुम्हाला विरोधातच बसायचं आहे असा टोलाही खासदार शिंदे यांनी काँग्रेसला (Congress) लगावला.

काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर असतानाही सत्तेत असल्याच्या आनंदात आहे.दहा वर्षांत 44 वरुन फक्त 99 वर पोहचली आहे. शंभरसुध्दा पूर्ण करता आले नाही. पण आम्ही 15 जागा लढून 7 निवडून आलो आहोत. अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालं, काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.आज आसपासचे देश मोदींना घाबरून आहेत असल्याचा दावाही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला.

संसदेतील आपल्या भाषणात खासदार शिंदेंनी विरोधकांच्या संविधान धोक्यात असल्याच्या मुद्दाही खोडून काढला. ते म्हणाले, विरोधी पक्षातील सगळे खासदार संविधान दाखवून शपथ घेत होते.संविधान धोक्यात आहे असं म्हणून तुम्ही मतं मिळवली, पण हा फेक नॅरेटिव्ह सारखा- सारखा चालणार नाही.बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वेळा हरवण्याचं काम काँग्रेसनं केलं.संविधान..संविधान म्हणून काही होत नसतं, संविधानाच्या वाटेवरून चालावं देखील लागतं असा चिमटाही त्यांनी काढला.

लोकसभेच्या निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची आणि नकली शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिलं. लोकं शिवसेना,बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत आहे. मुंबई ब्लास्टमधील आरोपी इकबाल मुसा याला ठाकरे गटाने प्रचारात उतरवलं,तरी तिथे आमचे नेते रवींद्र वायकर निवडून आले असेही आपल्या भाषणात कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठणकावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT