Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha election 2024) तोंडावर आज शिवसेना ठाकरे गट मुंबईत असणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहे. यासाठी कोल्हापुरातील सर्व पदाधिकारी आज मातोश्रीवर (Matoshree)दाखल झाले आहेत. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,विधानसभा प्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत.
कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून स्पर्धा सुरू झाली आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गटातील तीन मातब्बरांनी या मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केल्यानंतर अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. या सर्व घडामोडीवर उद्धव ठाकरे काय निर्णय घेण्यात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचा आढावा घेणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी म्हणजे आज १२ ते सायंकाळी ५ या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, यासह अन्य पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवले आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडे किती जागा घ्यायच्या या संदर्भात चर्चा होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वी कोल्हापूर उत्तर, कागल,राधानगरी, शाहूवाडी, करवीर या मतदारसंघावर दावा केला आहे. चंदगड मतदारसंघापासून याची सुरुवात होईल. त्यानंतर राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, उत्तर, शाहूवाडी, इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
आढावा घेतल्यानंतर निश्चित झालेल्या जागांवर उमेदवार कोण असावा? त्याची सर्वोतोपरी ताकद किती आहे? त्याला इतर कोणत्या नेत्यांचा पाठिंबा मिळू शकतो. महाविकास आघाडीतील इतर नेते मदत करतील का? या सर्व गोष्टींचा आढावा पक्षप्रमुख ठाकरे घेणार असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर लोकसभेची शिवसेनेकडे असलेली जागा काँग्रेसला दिली आहे. त्या बदल्यात कोल्हापूर उत्तरची विधानसभेची जागा मिळावी, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बैठकीतही याच मुद्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे यांच्याकडे आग्रह असणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा याच जागेवरून अंतर्गत धुसफुस सुरू आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी या मतदारसंघावर आपणच उमेदवार असल्याचे सांगितले आहे. शिवाय शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अंबाबाई देवीला साकडे घातले आहे. माजी जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी देखील याच मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केला आहे. या तिन्हीही पदाधिकाऱ्यांनी परस्पर दावेदारी केल्यानंतर त्याचे अंतर्गत मतभेद सुरू झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.