Vijay Vaddetivar Latest News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच नाराज असतात. त्यामुळे त्यांना विविध मागण्यांसाठी नेहमीच दिल्लीवारी करावी लागते. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार व मंत्र्यांना भरपूर निधी मिळवून दिला होता. त्यावेळी एवढे मिळूनसुद्धा ते नाराज होते. मात्र, या महायुती सरकारमध्ये अर्थखाते त्यांच्याकडे असूनही निधीसाठी त्यांना झगडावे लागत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार काय करता, असा सवाल करीत तुम्हाला आता तुमची ताकद दाखवण्याची गरज आहे, असे मला वाटते. नेहमीच नाराज राहण्याची भूमिका अजितदादांनी सोडली पाहिजे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
दिल्लीला गेल्यानंतर कोणी तरी म्हणाले, की अजितदादा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर रडले. मात्र, हे खरे आहे की नाही याच्या वादात मी पडणार नाही. अजितदादा यांनी निधीवर रडत बसण्यापेक्षा काम करून दाखवावे, असा सल्ला या वेळी त्यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मला पत्राद्वारे धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मी अधिक बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी बोलणे टाळले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)