राज्यात भाजप नेत्यांमध्ये सर्वांत ज्येष्ठ असूनही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दहा वर्षांपूर्वी मागे पडलेल्या आणि नंतर पक्षातूनच बाहेर फेकले गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरवापसीसाठी सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे खडसे यांचे खास मित्र असलेले विनोद तावडे त्यांच्या घरवापसीसाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग करत आहेत. भाजपच्या दिल्ली पक्षश्रेष्ठींमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या तावडे यांच्या शब्दाला पक्षात सध्या वजन आहे. या वजनाचा वापर करून ते Eknath Khadse यांना पुन्हा भाजपवासी करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपचे महासचिव असलेले तावडे यांचा दिल्लीत पक्षासाठी होणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात सहभाग असतो. त्यांच्या शब्दाला मान असून, बिहारमध्ये आज जो काही भाजपच्या बाजूने सत्ताबदल झाला आहे त्याचे मास्टर माइंड तावडे आहेत. भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे दिल्ली वर्तुळात बोलले जाते. याच आपल्या ताकदीचा वापर करून सध्या तावडे सर्वच राज्यात भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचा एक भाग म्हणजे एकेकाळी आपले असलेले आणि आता बाहेर असलेल्या माजी भाजप नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना तुम्ही भाजपमध्ये परतणार का? याबाबत भाष्य करताना तावडे यांचे नाव आवर्जून घेतले होते. “तावडे यांच्याकडून भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे यांची ही धडपड आहे. तावडे आणि आपले चांगले संबंध आहेत. बरीच वर्षे आम्ही पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. माझी ताकद त्यांना माहिती असल्याने कदाचित प्रेमापोटी ते माझ्या घरवापसीसाठी जोर लावत असावेत”.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या खासदार आणि खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनीसुद्धा आपल्या सासऱ्यांच्या घरवापसीबाबत सूचक वक्तव्य करत राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. “गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार आहे. रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरीश महाजन यांनीदेखील एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले आहे. “एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरून हॉटलाइन असेल तर त्यांनी लावावी.”
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.