Maharashtra Political News : शिंदें-फडणवीसांच्या पाडावासाठी एकजूट दाखविलेल्या आघाडीला 'चॅलेंज' करून काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदमांनी अपक्ष विशाल पाटलांना खासदार करून सांगलीवर हुकूम ठेवली. प्रसंगी 'सांगली आमचीच' असे ठणकावून सांगणाऱ्या विश्वजीत कदमांनी ठाकरेंशी पंगा घेतला. पण शेवटी हवे तेच करून त्यांनी निकालातूनही घडवून आणले.
सांगलीत ठाकरेंचे चंद्रहार पाटील उमेदवार असतानाही विशाल पाटलांना निवडून आणून कदमांनी काँग्रेससाठी बरेच काही केले. म्हणजे, देशभरात मोदी-शाहांच्या झंझावातातही एका खासदारामुळे 'सेंच्युरी' पासून लांब राहिलेल्या काँग्रेसला विश्वजीत कदमांनीच 'सेंच्युरी' पर्यंत पोहोचवले आहे. अर्थात, सांगलीतील विशाल पाटलांच्या विजयाने नव्हे, तर विश्वजीत यांच्या खेळ्यांमुळेच काँग्रेसला शंभरी पार करता आली. या सेंच्युरीचा काँग्रेसला मान केवळ विश्वजीत यांच्यामुळे मिळाला, हे नक्की!
महाविकास आघाडीत सांगलीतून ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला. त्यामुळे काँग्रेसला हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागले. मात्र येथून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही. विजय होताच विशाल पाटलांनी दिल्ली गाठली आणि काँग्रेसला पाठिंबा दिला.
याबाबत कदम म्हणाले, काही कारणांमुळे विशाल पाटलांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. आता निकाल लागल्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी काँग्रेसला, महाविकास आघाडीला समर्थन दिले आहे. यातच समाधान मानले पाहिजे. यानिमित्त सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून काँग्रेसची 'शंभरी' पूर्ण झाली याचा सांगलीकरांना मनापासून अभिमान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कदमांच्या उपस्थितीत विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. याबाबत पाटील म्हणाले, आजच्या भेटीत काहीही चर्चा झालेली नाही. माझ्या उमेदवारीसाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. त्यामुळे सर्वात प्रथम आभार मानले. आता कुठलीही अपेक्षा न ठेवता काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गेंची भेट घेऊन पत्र दिले. यापुढच्या काळात काँग्रेसच्या सोबतीनेच संसदेत काम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पुढे काम करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
काँग्रेसच्या बैठकांना येणार
काँग्रेसने राज्यातील नवनिर्वाचीत खासदारांसाठी शुक्रवारी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थित होत आहे. त्याचे आमंत्रण मिळाले असून बैठकीला जाणार आहे. तसेच दिल्लीतील बैठकीचेही निमंत्रण असून त्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे विशाल पाटलांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.