Vishwas Nangre Patil Sarkarnama
मुंबई

Vishwas Nangre Patil news : माझा भाऊ इथं ‘आयजी’ आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही! IPS विश्वास नांगरे पाटील झाले भावुक

Asha Bhosle tribute : स्वतःला एवढं सुंदर जपणाऱ्या, सर्वांची सदोदित काळजी घेणाऱ्या, इतरांच्या जीवनात मोगरा फुलवणाऱ्या, स्वरांचा अगाध बेबंद धबधबा असणाऱ्या, चिरतरुण आशाताई नावाप्रमाणेच प्रचंड आशावादी होत्या, अशी भावना विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Rajanand More

Mumbai News : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली. IPS विश्वास नांगरे पाटील यांनी आशा भोसले यांच्याविषयी एक आठवण सांगितली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयजी असतानाचा एक प्रसंग सांगत नांगरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सचिनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. उमंग या पोलीस कल्याण कार्यक्रमात आम्ही सचिनचा सत्कार करायचे योजिलें होते. तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हातून सचिनचा सन्मान व्हायला हवा होता. त्यावेळी पहिल्यांदा आशाताईंशी बोललो. निमंत्रण दिले. त्यांनीही आढेवेढे न घेता स्वीकारले.

कार्यक्रम नक्षत्रासारखा देखणा झाला. या प्रासंगिक निमित्ताने ताईंशी माझा ऋणानुबंध जमला. संभाजीनगरला मी आयजी होतो त्यावेळी आशाताईंचा शो होता. दहा वाजले. मी सहकुटुंब हजर होतो. शो रंगात आला होता. प्रेक्षक बेभान होऊन 'दम मारो दम' वर नाचत होते. वन्स मोर चा नादघोष बंद होईना. त्यावेळी आशाताई माईक वरून बोलल्या, ‘माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही’. आणि कार्यक्रम डॉट टाइम वर बंद केला, असे नांगरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

काहीतरी कारणाने आशाताईंचा फोन यायचा अधून मधून! भेटही व्हायची! महिन्याभरापूर्वी फोन करून मला लोअर परेलला घरी बोलावले. एका अबलेच्या गाऱ्हाण्यासाठी! परित्यक्ता होती, पण सोडून गेलेला नवरा दारू पिऊन येऊन मारत होता. बिचारीच्या नावावर एक खोली होती. ती लाटण्यासाठी तिचा खून करेल, अशी तिला भीती वाटत होती. मला तर पोलिसांनी ऍक्शन घ्यावी हे सांगितलेच. पण एका प्रथितयश महिला वकिलाला फोन करून तिची डोमेस्टिक व्हायलंस ची केस घ्यायला लावली. जी काही फी आहे ती मी देईन, असे त्या वकील बाईंना सांगितले, अशी आठवण विश्वास नागरे पाटील यांनी सांगितली आहे.

ज्या ज्या वेळी घरी बोलवायच्या, पोटभर चिकन मटण फिश खाऊ घालायच्या. शेवटचा फोन गेल्या आठवड्यात आला. आंध्र प्रदेशमधील एक गरीब महिला त्यांच्या घरी काम करते. तिच्या घरी घरफोडी झाली होती. होते नव्हते ते सगळे चोरीला गेले होते. मी माझ्या बॅचमेटला फोन केला. त्याने सूत्रे हलवली. चोर सापडला आणि सगळा मुद्देमालही. आशाताई सॉलिड खुश झाल्या. मला हरखून फोन केला. पुन्हा जेवायचे आमंत्रण दिले. मी त्यांच्या सहवासासाठी आणि चवदार मेजवानीसाठी आसुसलेला असायचो . पण अशा कशा आशाताई मला जेऊ न घालताच भुर्रर्र उडून गेल्या, असे IPS नांगरे पाटील यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

विश्वास नांगरे पाटील पुढे लिहितात की, त्यांची गाणी ही अशीच झटका देणारी. आर्त भावना जागवणारी, प्रेमात पाडणारी, विरह, वेदना,प्रणय, सौंदर्य, साफल्य सगळ्या भावांचा अविष्कार घडविणारी! प्रचंड वैविध्याच्या छटा आपल्या हरहुन्नरी, ऊर्जादायी, विजिगिषु आवाजातून आशाताई श्रावकाच्या हृदयात, मनात आणि रोमारोमांत भिनवायच्या. त्यांचा सुरेल आवाज हा नखशिखांत रोमांच उभे करायचा. त्यांच्या सुरांच्या मैफिलीत भिजून चिंब होण्याची मजा वेगळीच.

स्वतःला एवढं सुंदर जपणाऱ्या, सर्वांची सदोदित काळजी घेणाऱ्या, इतरांच्या जीवनात मोगरा फुलवणाऱ्या, स्वरांचा अगाध बेबंद धबधबा असणाऱ्या, चिरतरुण आशाताई नावाप्रमाणेच प्रचंड आशावादी होत्या. लतादीदीनंतर मोकळं झालेलं स्वरविश्वाचं आकाश आता पुरतं रितं झालं आहे. ती अवीट गोडी, ते चंचल तारुण्य, ते थिरकणारं डौलदार पाऊल, ती अप्रतिम अदा कुठे कशी शोधून सापडणार! ताई, तुम्ही अनंतात विलीन झाल्या आहात! त्या अनंताला किती आनंद झाला असेल, अशा शब्दांत नांगरे पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT