Balasaheb Thorat Sarkarnama
मुंबई

Assembly Session : फुटलेल्या आमदारांना सांभाळण्यासाठी निधीचा वापर ,अजितदादांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती; थोरातांची नाराजी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पुरवणी मागण्यांमध्ये निधी वाटपात फरक किती असावा. काही मतदारसंघात ७४२ कोटी, ५८० कोटी, ४८२ कोटी, ४५६ कोटी, ४३६ कोटी, ३९२ कोटी असे आकडे दिसतील. पण, काही मतदारसंघात शून्य तरतूद आहे. फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्याठी हा निधी वापरला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. यापुढच्या काळात त्यांनी भरपाई करावी; अन्यथा आम्हाला वाटा शोधाव्या लागतील, अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी निधी वाटपावर भाष्य केले. (We didn't expect this from Ajit Dada : Balasaheb Thorat's displeasure)

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी निधी वाटपावर भाष्य केले. ते म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मंजूर करत असताना आम्ही विरोधी पक्षात असताना आमच्या दोन ते अडीच हजार कोटी रुपयांच्या कामांना जी स्थगिती देण्यात आली होती. त्यावरील बंदी उठविण्यासाठी आमचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पुढाकार होता. मात्र, विकास कामांवरील स्थगिती उठवली जाईल, अशी आमची अपेक्षा अजितदादांकडून होती. त्यांनी स्थगिती उठवावी आणि आम्हाला न्याय द्यावा. पण दुर्दैवाने तसं घडलेलं दिसत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदारांची ५० हजार कोटी रुपये थकबाकी आहे. केवळ नगर जिल्ह्यातील ६२० कोटी रुपयचं देणं बाकी आहे. सरकारने ४१ हजार कोटी रुपये वाटपाचे ठरविले आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिली तर त्यात प्रचंड तफावत असल्याचे दिसून येत आहे. आपले २८८ मतदारसंघ आहेत. मी १९९५ ते ९९ हा युतीचा कालखंड मी पाहिलेला आहे. तसेच, २०१४ ते २०१९ चा काळ आम्ही अनुभवलेला आहे. त्यावेळी सुद्धा आम्ही तक्रार केलेली नाही, असेही थोरात यांनी मान्य केले.

थोरात म्हणाले की, आमच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडामध्येसुद्धा समान निधी वाटप केलेले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही जास्तीचा निधीचा आग्रह करायचो, त्यावेळी ते म्हणायचे की सर्वांना समान निधी दिला पाहिजे. रकार दोनदा फुटून बनलं. एखादा शिवसेना फुटली, आता राष्ट्रवादी. ज्यांना मंत्री करता आलं नाही, त्यांना भरपूर निधी मिळाला आहे. मंत्रिपद मिळालं नाही, त्यांना निधी देऊन सांभाळलं आहे.

फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्याठी हा निधी वापरला आहे. एक तर अन्याय करता आणि त्यांना सांभाळायचं म्हणून जास्तीत जास्त निधी वापरता. हा पैसा जनतेचा आहे, तो ठराविक लोकांसाठी वापरला जात आहे. एकदा आमदार आणण्यासाठी आणि पुन्हा त्यांना सांभाळण्यासाठी निधीचा वापर केला जात आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT