Manoj Jarange Patil, Sanjay Raut, CM Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'जरांगे नावाचे वादळ...' फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेताच राऊतांनी दिला इशारा, म्हणाले...

Sanjay Raut On CM Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्याआधीच त्यांना शुभेच्छा देत इशारा दिला होता. "फडणवीस हे काही आमचे शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देखील देतो. आम्ही विरोध पण करतो आणि मोठ्या मनाने शुभेच्छा देखील देतो. पण..."

Jagdish Patil

Mumbai News, 06 Dec : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी गुरूवारी (ता. 06 डिसेंबर) तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित विविध राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी देखील फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्याबद्दल सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून अभिनंदन केलं आहे. मात्र, यावेळीच त्यांनी महायुतीवर टीका केली आहे.

तसंच यावेळी त्यांनी फडणवीसांना इशारा देखील दिला आहे. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) काय करणार? जरांगे नावाचे वादळ शांत झाले नाही तर राज्यात अनेक प्रश्न नव्याने उभे राहतील, अशी भिती करत त्यांनी फडणवीसांना आरक्षणावरून अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. सामनामध्ये राऊतांनी लिहिलं, 'देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचे काय करणार? जरांगे नावाचे वादळ फडणवीस यांच्या भोवती घोंघावत आहे.

ते शांत झाले नाही तर राज्यात अनेक प्रश्न नव्याने उभे राहतील व सरकारअंतर्गत नवे विरोधक काड्या लावण्याचे काम हौसेने करतील.' असं म्हणत त्यांनी सरकारमधील काही लोक फडणवीसांच्या विरोधात काम करतील असा संशय देखील व्यक्त केला आहे. तसंच यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) सरकारवर कर्जाचा बोजा वाढत असल्याचंही लिहिलं आहे.

'राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोणत्या दिशेने जाणार आहेत? लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे 44 हजार कोटींचा बोजा राज्यावर आहे. 1500 ऐवजी बहिणींना 2100 रुपये देऊ असे या मंडळींनी निवडणूक प्रचारात वचन दिले. त्यामुळे बोजा वाढत जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचेही वचन आहे. ही वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजन व शिस्त लावावी लागेल.'

तर यावेळी त्यांनी 'महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली', असं म्हणत फडणवीसांना टोला देखील लगावला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्याआधीच त्यांना शुभेच्छा देत इशारा देखील दिला होता. जरांगे यांनी म्हटलं होतं, फडणवीस हे काही आमचे शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देखील देतो. महाराष्ट्रात आमची संस्कृती आहे.

आम्ही विरोध पण करतो आणि मोठ्या मनाने शुभेच्छा देखील देतो. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता. शिवाय ज्या फडणवीसांवर जरांगे यांनी सतत टीका केली तेच फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे जरांगे आपल्या आंदोलनाची दिशा नेमकी काय ठरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT