Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya News: ते १९ बंगले कुठं गायब केले? रश्मी ठाकरेंचं नाव घेत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

सरकारनामा ब्युरो़

Rashmi Thackeray: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी ED) सातत्याने कारवाई होत आहे. कोकणमधील रिसॉर्टप्रकरणी ठाकरे गटातील सदानंद कदम यांना अटक करून त्यांनी ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून दीड महिन्यात तीन वेळा छापेमारी करण्यात आली.

या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईबाबत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोमय्यांवर सतत टीका करतात. त्यावर बोलताना सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच त्यांना बंगल्यां प्रकरणाचे उत्तर देण्याचे आवाहनही केले.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, "उद्धव ठाकरे मला हिणवतात. आरोप केले तर शिव्या देतात. मी उद्धव ठाकरेंना खुले चॅलेंज देतो, ज्या शिव्या द्यायच्या ते द्या, पण तुमच्या पत्नीच्या रश्मी ठाकरेंच्या नावे असलेले १९ बंगले पाडले, कुठं गायब केले तेही सांगा. त्याचा हिशोब मागितला तर तो द्याना! सुप्रिया सुळे आणि संजय राऊत रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांचे रिपोर्ट नष्ट केल्यावर बोलत नाहीत. त्याचेही त्यांनी उत्तर द्यावे. भ्रष्टाचार केला ना आता हिशोब मागणारच."

संजय राऊतांचा (Sanjay Raut) आरोप आहे की ईडीची कारवाई राजकारणातून प्रेरीत झालेली आहे. जो भाजपच्या विरोधात बोलतो त्यांच्याविरोधात कारवाई केली जाते. त्या वक्तव्याचाही सोमय्यांनी यावेळी समाचार केला.

ते म्हणाले की, "आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्याकडे बोलण्यासारखे काही राहिले नाही. निवडणूक आयोगाने (ECI) त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यावर त्यांनी निवडणूक आयोगावर दोन हजार कोटींचा व्यवहार झाल्याच आरोप केला. 'ईडी'ने राऊतांना अटक केली तर राजकारण होतंय असे म्हणतात."

सोमय्यांनी ४० हजार शेकऱ्यांवर अन्याय झाला तर आम्ही हिशोब मागणार, असे आव्हान हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना दिले आहे. सोमय्या म्हणाले, "हसन मुश्रीफ यांनी स्वतः उच्च न्यायालय आणि इनकम टॅक्स कार्यालयात जाऊन १५० कोटी रुपयांची मनी लाँन्ड्रिग केल्याची कबुली दिली. त्यावर त्यांनी सेटलमेंटची भाषा केली. आता सहकारी बँकेचा घोटाळा बाहेर आला आहे. ४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने लूट केल्याचे बाहेर आले आहे. मी काय म्हणतो, 'ईडी' काय करते हा मुद्दा नाही, तुम्ही माफियागिरी केली, त्याचा हिशोब द्यावा लागणारच!"

दुसऱ्यांवर आरोप केल्यानंतर स्वतःची करतूद लपत नसते, असे म्हणत सोमय्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "संजय राऊतांनी विक्रांत घोटळ्यात ५७ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मात्र ५७ पैशांचाही कागद त्यांनी दिला नाही. त्या प्रकरणी उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारकडे तीन वेळा उत्तर मागितले. त्यामुळे कुणावर ५७ हजार कोटी, कुणावर एक हजार कोटी असे आरोप करून स्वतःची करतूद लपत नसते."

किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ती नोटीस कशाबद्दल आहे, त्याचाही सोमय्यांनी यावेळी खुलासा केला. ते म्हणाले की, "मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी जी तक्रार दाखल केली त्याची प्रत मला कशी मिळाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याबाबत चौकशी होऊ द्या! मात्र शेतकऱ्यांवर झालेला अन्याय खराच आहे. त्यांनी दिलेली तक्रार खोटी आहे, असे न्यायालय म्हटलेले नाही. विषय हसन मुश्रीफांनी शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचारांचा आहे. घोटाळ्या झालेल्याबाबतची माहिती किरीट सोमय्यांकडे कशी येते, त्याची चौकशी होऊ द्या."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT