Mumbai, 18 July : विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. त्या उत्तराच्या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदी सक्ती हवीच कशाला’ या लेखसंग्रहावरून जोरदार टोलेबाजी केली. या लेखसंग्रहाबाबत आणखी काही कात्रणं जोडणं आवश्यक होतं, अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली. त्याचवेळी समोर विरोधी बाकावर बसलेल्या आदित्य ठाकरेंनी ‘पुढच्या वेळी नक्की जोडण्यात येईल’ असे उत्तर दिले. आदित्य यांच्या उत्तरावर बोलताना फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे शेजारी बसलेले असताना आपल्याला पुढच्या वेळी भेटावंच लागणार आहे, असे विधान केले. त्यावेळी शिंदेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती हवीच कशाला हा वृत्तपत्र लेखांचा संग्रह मला काल (ता. 17 जुलै) मिळाला. तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की, त्यात आणखी काही कात्रणं जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये समितीने पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करण्याची शिफारस केली होती, तो अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वीकारला होता.
भाषेच्या उपसमितीत शिवसेनेचे उपनेते सदस्य होते. त्यांनीही पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आठवडाभरानंतर जे मिनिट्स कन्फर्म करण्यासाठी येतात. उद्धव ठाकरे यांनी ते स्वीकारून त्यावर सही केली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला हेाता.
ते म्हणाले, मुख्य ही कॅबिनेट असते, जीआर हे प्रतिफळ असतं, आदित्यजी. मी त्यावर आक्षेपच घेत नाही. उद्धव ठाकरे यांनी काल जेव्हा मला हा लेखांचा संग्रह दिला. तो मी नीट वाचला. पण माझी एवढीच मागणी आहे की, माशेलकर समितीचा स्वीकारलेला अहवाल, तो अहवाल स्वीकारल्यानंतर आलेल्या बातम्या, मंत्रिमंडळ निर्णयानंतर आपण (ठाकरेंना उद्देशून) ऑफिशयल केलेली पोस्टची कात्रणंही जोडावीत, अशी माझी माफक मागणी आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर ‘त्याबाबतचे पुस्तक बनवून तुम्हाला देण्यात येईल,’ असे एका सदस्याने म्हटले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी हजरजबाबीपणे ‘पुढच्या वेळी’ देण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्या वेळी शेजारी एकनाथ शिंदे शेजारी बसलेले असतानाच फडणवीस यांनीही ‘यस’ म्हणत होकार दर्शविला आणि आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल नाही, तर (पत्रकारांकडे बोट दाखवत) यांना खाद्य कसे मिळणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता हे कठीणच होऊन गेले आहे, जयंतराव. तुम्ही माझ्याकडे येऊन गेलात की तुम्ही भाजपमध्ये येणार. ठाकरेंकडे हात करत हे आमच्याकडे आले की, ते भाजपसोबत येणार, अशी चर्चा रंगते. आपण संवादाच्या गोष्टी करतो. मी माध्यमांना दोष देत नाही. पण त्यांना विनंती करतो, नेत्यांमधला संवाद राहू द्या. कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्यांच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युती होतेय, असं नसतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.