Why Kirit Somaiya Went to Delhi :  Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya Delhi Visit : विरोधकांच्या तक्रारीसाठी जाणाऱ्या किरीट सोमय्यांना आता दिल्लीत कुणी बोलवलं ?

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : ऐन विधीमंडळाच्या अधिवेशनातच आक्षेपार्ह व्हिडिओ उघड झाल्याने पत घालवून घेतलेले भाजपचे नेते किरीट सौमय्या गुरुवारी रात्री अचानक दिल्लीकडे ' टेक ऑफ ' घेतले. एरवी दिल्लीत जाऊन तपासयंत्रणांच्या कार्यालयांत विरोधकांची गान्हाणे मांडणाऱ्या सौमय्यांना व्हिडिओची शहनिशा करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनी बोलावून घेतले की, ते आता पुन्हा कोणाच्या तक्रारींसाठी दिल्लीत दाखल झाले, याची चर्चा आहे.

काहीही असो, सौमय्यांना व्हिडिओ भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही या प्रकरणात वरिष्ठांकडून विचारणा झाल्यास सौमय्या नेमका काय खुलासा करणार, याचीही उत्सुकता आहे.

दिल्लीला गेलेल्या सोमय्यांना, 'तुम्ही अमित शहांची भेट घेतली का’, असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारल्यावर सोमय्यांनी केवळ ‘नाही’ एवढेच उत्तर दिले. तसेच, सोमय्यांनी माध्यम प्रतिनिधींनी आक्षेपार्ह चित्रफितींबाबत विचारले असता‘ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हे प्रकरण नेण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं.

आक्षेपार्ह व्हिडिओमुळे विरोधकांकडून सोमय्यांवर सातत्याने आरोपांच्या फैऱी झडत आहेत. अधिवेशनातही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरत सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली.गेल्या काही महिन्यापासून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांचे कथित आर्थिक गैरव्यवहार उघड केले.

खासदार संजय राऊत, अनिल परब, रविंद्र वायकर, यशवंत जाधव, राजन साळवी यांच्यासह थेट उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबियांवरही गंभीर आरोप केले होते. त्याची माहितीही त्यांनी ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या यंत्रणांना दिली. यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीच्या वाऱ्याही केल्या. पण ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये पडलेल्या फूटीनंतर मात्र सोमय्यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा घोटाळा उघडकीस आणला नाही. तसेच, त्यांनी आरोप केलेले जे नेते भाजपमध्ये गेले, त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवायाही थांबवण्यात आल्या.

पण आता ते स्वत:च आक्षेपार्ह व्हिडिओच्या प्रकरणामुळे वादात अडकले आहेत. यासाठीच ते दिल्लीला गेले असावेत अशी,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सर्व प्रकरणावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नाहीत. ज्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी एका पत्रातून केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT