Baba Siddique Shot Dead Case Update Sarkarnama
मुंबई

Baba Siddique : बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला तेव्हा काऊंटर फायरिंग का केली नाही? सुरक्षारक्षकाने घटनाक्रमच सांगितला

Jagdish Patil

Baba Siddique Shot Dead Case Update : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या कार्यालया बाहेर तीन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. मुंबई पोलिसांनी या हत्या प्रकरणी आतापर्यंत तीन ते चार संशयितांना तब्यात घेतलं आहे. मात्र, सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबई पोलिसांकडून 2+1 अशाप्रकारची सुरक्षा पुरवण्यात आली होती.

त्यामुळे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने काऊंटर फायरिंग का केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबतचे उत्तर आता त्या दिवशी सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकानेच दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नुकतंच बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. सिद्दीकी यांना 2+1 अशी सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानुसार, बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी दिवसा 2 आणि रात्री एक सुरक्षारक्षक तैनात असायचा.

तर 12 ऑक्टोबच्या रात्री बाबा सिद्दीकी खेरवाडी जंक्शनजवळ मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर दोन पोलिस होते. मात्र, रात्री साडेआठ वाजता ड्युटी संपल्याने त्यातील एक पोलिस सुरक्षारक्षक निघून गेला.

दरम्यान, बाबा सिद्दीकी झिशान यांच्या कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी गोळीबार केला. यावेळी सिद्दीकी यांच्यासोबत एकच पोलिस कर्मचारी उपस्थित होता. त्याने सांगितलं की, 'तीन मारेकऱ्यांपैकी शिवकुमार याने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तर दुसरा हल्लेखोर धर्मराज कश्यप याने त्याचवेळी मिरचीचा स्प्रे हवेत फवारला. हा स्प्रे डोळ्यात गेल्यामुळे मी काऊंटर फायरिंग करू शकलो नाही.'

झिशान सिद्दीकी यांनी गेल्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेतली होती. माझ्या वडिलांवर गोळीबार झाला तेव्हा सुरक्षारक्षक काय करत होता? त्याला काहीच कसे करता आले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून वेगात तपास सुरू आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्यांची चौकशी सुरु आहे. यासाठी पोलिस दलाची पथके अन्य राज्यांमध्ये जाऊन संशयितांची तपासणी करत आहेत.

अशातच आता झिशान सिद्दीकी हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांचाही जबाब नोंदवला. त्यामुळे आता ते फडणवीसांशी नेमकी काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT