Shivsena  Sarkarnama
मुंबई

बाळासाहेबांचे ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार? तेजस ठाकरेंची तोडफोड सेना सक्रिय होणार ?

Tejas Thackeray : दसरा मेळाव्याला ठाकरे आपला हुकमी एक्का बाहेर काढणार?

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिवसेना कोणाची यावरुन शिंदे - ठाकरे गटात लढाई सुरु आहे. शिंदे गटाकडून दबावतंत्र अवलंबले जात असतानाच, ठाकरे गटालाही आक्रमक अशा चेहऱ्यांची गरज आहे, तेजस ठाकरे यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. दसरा मेळाव्याच्या बॅनरवर तेजस यांची एन्ट्री झाली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वक्तव्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. आता दसरा मेळाव्याला ठाकरे हे आपला हुकमी एक्का बाहेर काढणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असून शिवसेना कोणाची यावरुन शिंदे व ठाकरे गटात अस्तित्वाची लढाई सुरु आहे. शिवतिर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली असून, शिंदे गटाने बीकेसीवर दसरा मेळावा भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

दसरा मेळाव्याला आपली ताकद दाखविण्यासाठी शिंदे व ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही गटाकडून शहरात बॅनर लावून शक्तीप्रदर्शन करण्याची चढाओढ लागली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी डोंबिवली स्टेशन परिसरात दसरा मेळाव्याचा बॅनर लावला असून या बॅनरवर ठाकरे घराण्यातील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य यांसह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. यामुळे दसरा मेळाव्याला तेजस राजकारणात अधिकृत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

तेजस हे वन्यजीव संशोधक आहेत. राजकारणात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी गेल्या काही महिन्यांपासून ते वडील आणि भावासोबत अनेक राजकीय बैठकांना उपस्थित होते. शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केल्यानंतर कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले आहेत. पक्षात तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटात एकच उत्साह संचारला आहे.

तर दुसरीकडे शिंदे गट देखील आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रत्येक शहरातून दसरा मेळाव्याला किमान 10 बस गेल्या पाहीजेत असा प्रयत्न दोन्ही गटाकडून सुरु आहे. त्यासाठी दसराच्या आधीच शहरात बॅनरबाजी करत आपली ताकद दाखविण्यास दोन्ही गटाने सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर तेजस यांचा फोटो लागल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे आपला हूकमी एक्का बाहेर काढणार आणि बाळासाहेबांची शिवसेना आता त्यांचे नातू सावरणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

काय होते बाळासाहेबांचे वक्तव्य ?

आदित्य ठाकरे यांची राजकारणात अधिकृत प्रवेश झाला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेजस ठाकरेंचादेखील उल्लेख केला होता. त्यांनी म्हटलं होत की, ''आदित्य हा शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. पण तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याची सेना ही तोडफोड सेना असेल.'' असे बाळासाहेबांनी त्यावेळी वक्तव्य केले होते. त्यामुळे आता हे वक्तव्य खरे ठरणार का ? याविषयी एकच चर्चा शहरात सुरु झाली आहे.

बॅनरवरील त्या चिन्हाची चर्चा :

खरी शिवसेना कोणाची यासोबतच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आपल्याकडे यावे यासाठी शिंदे गटाची धडपड सुरु असून ठाकरे गट देखील आपले चिन्ह टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाकडून लागलेल्या बॅनरवरील चिन्ह साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राजमुद्रेचा आकार (षटकोनात) आणि त्यातधनुष्यबाण असे चिन्ह शिंदे गटाने झळकविले आहे. तर प्रत्यक्षात शिवसेनेचे वर्तुळ आणि त्यात धनुष्यबाण, त्याखाली शिवसेना लिहिलेले असे अधिकृत चिन्ह आहे. त्यामुळे याचीही चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT