Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
मुंबई

मलिकांच्या विरोधात थेट विनयभंगाची तक्रार; आणखी एका वानखेडेंनी आणलं अडचणीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासमोरील अडचणीत आता वाढ झाली आहे. वानखेडे परिवारातील आणखी एका सदस्याने मलिक यांच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या भगिनी यास्मीन वानखेडे (Yasmeen Wankhede) यांनी मलिक यांना न्यायालयात खेचलं आहे.

यास्मीन यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानी आणि विनयभंगाची तक्रार केली आहे. अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात त्यांनी मलिक यांच्या विरोधात हा फौजदारी दावा केला आहे. पाठलाग करणे, मानहानी करणे आणि विनयभंगाचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे मलिक यांच्या विरोधात वानखेडे परिवारातील आणखी एक सदस्य मैदानात उतरल्याचे मानले जात आहे.

यास्मीन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मलिक यांनी मागील काही दिवसांत केलेली ट्विट आणि वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतून माझी बदनामी केली. याचबरोबर माझ्याबाबत निराधार आरोप केले. हे आरोप खोटे असल्याचे माहिती असूनही त्यांनी ते केले. मलिक यांचे जावई समीर खान यांचे प्रकरण माझे बंधू समीर वानखेडे तपासत आहेत. समीर खान सध्या जामिनावर बाहेर आहेत. यामुळे सूडबुद्धिने मलिक हे खोटे आणि बदनामीकारक आरोप करीत आहेत.

मलिक यांची न्यायालयात माफी

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांना वानखेडे यांच्याविषयी बोलणार नाही, असे हमीपत्र दिले होते. पण ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले होते. त्यावरून ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये मलिकांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करण्यात आला होता. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले होते. त्यावर न्यायालयाने मलिकांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार मलिकांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

त्यावरील सुनावणीदरम्यान, मलिक यांनी ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांच्यामार्फत बाजू मांडली. मी फक्त सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केलेली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी बाजू मलिक यांनी मांडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT