Aditya Thackeray, Mamata Banerjee sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत!

मुंबईतील 'ट्रायडेण्ट' हॅाटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ममता बॅनर्जी भेटल्या. या भेटीविषयी राऊतांनी 'सामना'च्या 'रोखठोक'मध्ये लिहिलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होत्या. त्यांची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जी या मुंबईतील 'ट्रायडेण्ट' हॅाटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना भेटल्या. त्यावेळी संजय राऊतही उपस्थित होते. या भेटीविषयी राऊतांनी 'सामना'च्या 'रोखठोक'मध्ये लिहिलं आहे.

''आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. ‘तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे’, असे ममता म्हणाल्या,'' असे राऊतांनी रोखठोकमध्ये लिहिलं आहे.

'महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले बंगाली जनतेस आकर्षित करतात,’ असे बॅनर्जी म्हणाल्या. ‘तुमच्याकडे ‘झू’ आहे काय? कोणते प्राणी त्यात आहेत?’ यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील राणी बागेची माहिती दिली. ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला व ममता बॅनर्जी यांनी तो तत्काळ स्वीकारला. ‘लाल, बाल, पाल हा देशाचा त्रिशूल स्वातंत्र्य लढ्यात होता. महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि बंगालचे बिपिनचंद्र पाल हे त्या त्रिशुलातले दोन भाले. ‘लाल बाल पाल’च्या निमित्ताने ऐतिहासिक पर्यटन योजना तयार करता येईल. दोन्ही राज्यांतील नव्या पिढीलाही इतिहासाचे भान त्यामुळे राहील.’ असे आदित्य यांनी सांगितले व ममतांनी ते मान्य केले.

राऊत म्हणतात, ''आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील तरुण, कार्यक्षम मंत्री. मुख्यमंत्र्यांचे ते चिरंजीव आहेत. हा शिक्का त्यामुळे पुसायला हवा. ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. ‘तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगले काम तुम्ही करताय. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाणघेवाण वाढायला हवी. प. बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे तो वाढला पाहिजे,''

''ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो ‘खेला होबे’ केला, दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले,'' असे राऊत म्हणतात.

''ही बहीण सिद्धिविनायक मंदिरात गेली. गणपतीपुढे नतमस्तक झाली व हात जोडून तिने उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. संध्याकाळच्या भेटीत त्या म्हणाल्या,’गणपतीचा ‘लाडू’ म्हणजे मोदक मला फार आवडतो. कोलकात्यातील मराठी लोक मला नेहमी मोदक पाठवतात. कोलकात्यात मराठी समाज आहे. त्यांचे आमचे संबंध उत्तम आहेत. महाराष्ट्र मंडळात आमच्या नियमित बैठका होत असतात. प. बंगालचे महाराष्ट्राशी नाते कायम टिकले पाहिजे,’ असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला,'' असे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

''मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र एका रात्रीत अहमदाबादला खेचून नेले. त्या लूटमारीवरही भाजपने भाष्य केले नाही, पण ममता बॅनर्जी प्रकरणात भाजपची भूमिका टोकाची आहे. ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या. त्यांनी वादळही निर्माण केले आणि लढण्याची प्रेरणाच देऊन गेल्या.’ असे राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT