Mumbai firing incident, 19 Oct : मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत अभिनेते, राजकारणी आणि व्यावसायिक सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षित असल्याची अपेक्षा कशी करायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच राज्यातील पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झिशान सिद्दीकी यांनी माध्यमांशी सवांद साधताना, मागील दोन महिन्यांत त्यांना चार वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा केला. शिवाय वारंवार धमक्या मिळूनही त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली नसल्याची अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारला त्यांच्याच आमदाराने आरसा दाखवल्याची चर्चा आहे.
ते म्हणाले, "गेल्या दोन महिन्यांत मला चार वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तरीही माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली नाही. झिशान सिद्दीकीवर गोळी झाडण्याची सरकार वाट पाहत आहे का? त्यानंतरच माझी सुरक्षा वाढवण्याचा विचार केला जाणार आहे का? ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी शक्य तितकी कठोर पावले उचलली पाहिजेत."
मुंबईत राजकीय नेते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना लक्ष्य करून वारंवार अशा घटना घडत असल्याबद्दलही झिशान सिद्दीकी यांनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांमुळे नागरिकांचा सुरक्षा यंत्रणेवरील विश्वास कमी होत असून अशा पद्धतीने अभिनेत्यांवर फायरिंग होणं हे आपलं इंटेलिजन्स फेल्युअर आहे, असं सिद्दीकी म्हणाले.
यावेळी झिशान सिद्दीकी यांनी त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचाही मुद्दा उपस्थित केला. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संपूर्ण कटाचा उलगडा होऊन कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
या प्रकरणातील फरार आरोपी अनमोल बिश्नोई याला भारतात आणून त्याची चौकशी करण्यासाठी आपल्या कुटुंबाने अमेरिकन सरकारकडे विनंती केल्याचेही झिशान यांनी सांगितले. मात्र, अद्याप मुंबई पोलिसांना अनमोल बिश्नोईची चौकशी करण्याची संधी मिळालेली नाही, असा दावा त्यांनी केला.
तसंच गुजरातमधील तुरूंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचीही या प्रकरणी चौकशी केली जावी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे नेमका सूत्रधार कोण होता आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग होता, हे समोर येणे आवश्यक असल्याचंही झिशान यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.