Nagar News : अयोध्येत सोमवारी प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण देशभर विविध धार्मिक उपक्रम होत आहे. देशात दिवाळीसारखे वातावरण असणार आहे. बेलापूर ग्रामपंचायतीत या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यात मांसाहरी विक्रेते सहभागी झाले होते. या बैठकीत अयोध्यामधील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मांसाहरी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असा निर्णय घेणारे नगर जिल्ह्यातील बेलापूर हे पहिले गाव ठरले आहे.
अयोध्येत सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील मांसाहरी आणि मद्य दुकाने बंद ठेवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असताना नगर जिल्ह्यातील बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे मांसाहरी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे.
उपसरपंच अभिषेक खंडागळे, सदस्य मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना, तशी विनंती केली. तसा विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला संमती दिली.
बेलापुरमधील (Belapur garmpnachyat ) मांस विक्रेत्यांच्या या निर्णयाचे नगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार, मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
बेलापूर जन्मभूमी असलेले गोविंद देवागिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांची प्रभू श्रीराम मंदिराच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली. यानंतर ते प्रथमच बेलापुरात आले. मुस्लिम समाजाने त्यांना मशिदीमध्ये नेत राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती.
त्यासोबतच आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण गेल्यावर्षी एकाच दिवशी आले होते. एकाच दिवसाचे हिंदू धर्मातील महत्त्व लक्षात घेऊन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापुरातील ()मुस्लिम बांधवांनी घेतला होता, या निर्णयाचे महाराष्ट्रात कौतुक झाले.
(Edited By Sachin waghmare)
प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला पुणे शहर कुरेशी समाजातील मटण व चिकन विक्री दुकाने व सर्व व्यवहार बंद ठेवणार आहेत. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया कुरेशी जमियतुल कुरेश एक्शन कमिटी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी जाहीर केले आहे. गुरुवारी कुरेशी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय झाला असल्याचे कुरेशी यांनी सांगितले .