MP Kirit Somaiya speaking at the press conference
MP Kirit Somaiya speaking at the press conference sarkarnama
नगर

किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकार हे डाकू आणि माफियांचे

मार्तंड बुचुडे

पारनेर : पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली होती. पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली होती.

दिल्ली येथे बचाव समितीने समाजसेवक माणिक जाधव व भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली. त्या वेळी सोमय्या यांनी कारखाण्याचे सभासद व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे असे आश्वासन दिले होते. त्या नुसार सोमय्या यांनी आज पारनेर साखर कारखान्याला भेट दिली. तेथील कामगार, शेतकरी व पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष ( दक्षिण ) अरूण मुंडे, कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ थोरात, अश्विनी थोरात, सुनील थोरात, सागर मैड, सुभाष दुधाडे आदी उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकार हे डाकू आणि माफियांचे सरकार आहे. त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी राज्यात हाहाःकार माजविला आहे. लोकांना घराबाहेर सुद्धा पडू देत नाहीत, ना गणेश दर्शन ना देव दर्शन या सरकारचा जन्मच मुळात भ्रष्टाचार व माफियागिरीतून झाला आहे.

जरंडजेश्वर साखर कारखाना ओंकार बिल्डरने विकत घेतला व लगेचच भाडेपट्याने चालविण्यास दिला मात्र हा कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कोणी दिले ते पैसे कसे आले त्या धर्तीवर पारनेर कारखानाही क्रांती शुगरेने विकत घेतला. तो विकत घेण्यासाठी 32 कोटी रुपये कसे जमा केले त्यांना 23 कोटी रुपये अतुल चोरडीया व सात कोटी रूपये अक्षय लँड डेव्हलपर यांनी दिले ते कसे व कोणत्या मार्गाने दिले.

क्रांती शुगरकडे पैसेच नव्हते तर त्यांना कारखाना विकलाच कसा? कारखाण्यावरील कर्जापोटी राज्य सहकारी बँकेने मागणी पैशाची मागणी केल्यावर याच बँकेने क्रांती शुगरला कर्ज कसे दिले? शेतकरी व कामगार हितासाठी कारखाना चालला पाहिजे मात्र त्यात झालेल्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे व जर घोटाळा झाला असेल तर त्यांना त्याची शिक्षाही झाली पाहिजे. पारनेर कारखाना विक्री प्रकरणी मी स्वताः लक्ष घालून कामगार व शेतकरी यांना न्याय मिळून दिल्या शिवाय राहणार नाही असेही सोमय्या यांनी सांगितले.

कोल्हापूरला गेल्या शिवाय राहणार नाही

या वेळी पवार व साखर हे समीकरण आहे. मला कोल्हापूरला पोलिसात तक्रार करण्यासाठी जाऊ दिले नाही. ही सरकारची दादागिरी आहे. पोलिसांनी मला अडविले असे असले तरीही मी पुढील आठवड्यात कोल्हापूरला गेल्या शिवाय राहाणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पुराव्याच्या आधारे करणार आहे. माझ्यावर साडेपाचशे कोटीच्या अब्रू नुकसानीच दावा लावतात व आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांच्यावर मात्र सव्वा रुपयांची या अनिल परब व संजय राऊत यांची लायकी काय असा प्रश्नही या वेळी त्यांनी उपस्थित केला.

सोमय्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष

सोमय्या यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करण्याची शक्यता होती. त्यामुळे या दौऱ्याच्या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या दौऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पारनेर कारखाना ही पारनेरची कामधेनू आहे. त्यामुळे कारखाना वाचला पाहीजे तो पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात यावा अशी इच्छा व त्यासाठी प्रयत्न आमदार नीलेश लंके यांनी या पुर्वीच सुरू केले होते त्यामुळे आजच्या दौऱ्याच्या वेळी आमदार लंके यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या दौऱ्याला विरोध केला नसावा अशी चर्चा तालुक्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT