अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येत सत्ता मिळविली आहे. शिवसेनेला महापौरपद तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळाले. हे सत्तांतर जून महिन्याच्या अखेरीस झाले. या घटनेला अडीच महिने झाले तरी महापालिकेतील विरोधी पक्षनेता ठरत नव्हता. NMC got Leader of Opposition from the meeting of Chandrakant Patil and Shivaji Kardile
महापौर व उपमहापौर निवडीनंतर भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद मिळणार हे निश्चित झाले होते. मात्र भाजपकडून विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होत नव्हते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आदी दिग्गज अहमदनगर शहरात येऊन गेले. नगरसेवक व कार्यकर्त्यांसमवेत बैठका झाल्या मात्र विरोधी पक्षनेतेपदाची कोंडी काही फुटत नव्हती.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी बुथ कमिट्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील भाजपमध्ये अलबेल नसल्याचेच उघड झाले. एका माजी नगरसेवकाने थेट शहर जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी केली होती. विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपकडूनच चार नावे पुढे येत होती. नावांवर एकमत होत नसल्याने अखेर चंद्रकांत पाटलांनी ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीतही तोडगा निघाला नाही. मात्र हे पद ठरविण्याचे अधिकार कर्डिलेंकडे देण्यात आले.
दरम्यान महापालिकेत महिला व बालकल्याण समितीची निवडणूक झाली. शिवसेनेने सभापतीपद तरी राष्ट्रवादीने उपसभापतीपद बिनविरोध मिळविले. भाजपने या निवडणुकीत उमेदवारी अर्जही नेला नाही. मागील अडीच महिन्यांत सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपने कोणतेही आंदोलन केलेले नाही. जणू काही शहरातील भाजप निद्रिस्त झाल्याची स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपत बारस्करांकडे विरोधी पक्षनेते पद आहे.
अखेर दोन दिवसांपूर्वी शिवाजी कर्डिले यांनी पुण्यात चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. या भेटीतून महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. चंद्रकांत पाटलांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे हे महापालिकेतील विरोधी पक्षनेते असतील अशा आशयाचे पत्र अहमदनगर महापालिकेला पाठविले आहे.
त्यामुळे आतातरी भाजप निद्रेतून उठून महापालिकेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार का, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. अहमदनगर शहरात रस्त्यांची दुरवस्ता झाली आहे. फेज 2, अमृत सारख्या योजनांची कामे प्रलंबित आहे. यावर भाजप आवाज उठणार की फक्त बघ्याची भुमिका बजावणार यावर शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.