Nagar News : पाथर्डीतील लोकप्रतिनिधींना हप्ता न दिल्याच्या कारणावरून शहरातील मुख्य रस्त्याचे काम काहींनी बंद पाडले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अॅड. प्रतापराव ढाकणे हे या मुद्यावर आक्रमक होत नगरपालिका प्रशासनावर त्यांनी त्यांचा संताप काढला. या संतापाला नगरपालिका कार्यालयाच्या इमारतीमधील मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची थेट पहिल्या मजल्यावरून खाली रस्त्यावर फेकण्यात आली, तर इतर खुर्च्यांची मोडतोड करून वाट मोकळी करून दिली.
प्रतापराव ढाकणे हे संयमी नेतृत्व असून त्यांच्याकडे वक्तृत्व कौशल्य आहे. आक्रमक भाषणासाठी ते ओळखले जात असले, तरी कृतीत संहिता असते. परंतु त्यांनी नगरपालिकेतील त्यांच्या कृतीतील आक्रमकता त्यांच्या संहिता टिकली नाही. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कामाविषयी सर्वसामान्यांमध्ये असलेला संतापाला प्रतापराव ढाकणे यांनी त्यांच्या कृतीतून वाट मोकळी करून दिल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
भाजपत असलेले अॅड. प्रतापराव ढाकणे हे २०१४ मध्ये राष्ट्रवादीमध्ये आले. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भाजपची लाट असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे राजकीय करिअर धोक्यात घालण्यासारखेच होते. पुढे झाले देखील तसेच! केंद्रात भाजपची सत्ता आली. राज्यात युती सरकार आले. गेली दहा वर्षे भाजप हे सत्तेत आहे.
अॅड. प्रतापराव ढाकणे हे भाजपमध्ये असते, तर कुठेतरी सत्तेत असते. परंतु त्यांनी राष्ट्रवादीत (Ncp Congress) येऊन संघर्ष निवडला. गेली दहा वर्षे ते राष्ट्रवादी राहून सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करत आहेत. या संघर्षाच्या काळात त्यांनी संयम दाखवला. सत्तेजवळ जाऊन पुन्हा तेथून संघर्ष निवडणे हे देखील काही सोपे नाही. परंतु प्रतापराव ढाकणे यांनी संघर्षाला प्राधान्य दिल्याने ते आजही पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आजही ते लढत आहेत. प्रतापराव ढाकणे यांचे वक्तृव आक्रमक आहे. पण त्यात देखील एक आचारसंहिता असते. यातून ते समोरच्यांची अलगद कोंडी करतात.
पाथर्डी शहरातील रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधीला हप्ता न दिल्याने काम बंद पाडण्याच्या मुद्यावरून अॅड. प्रतापराव ढाकणे यांचा संयम सुटणे हा विषय चर्चेचा ठरला आहे. राजकारणातील प्रत्येक मुद्दा कधी, केव्हा पुढे येईल हे सांगता येत नाही. प्रतापराव ढाकणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या इमारतीत केलेली मोडतोड हा मुद्दा पुढे राजकीय कोंडीचा ठरू शकतो. याचा विसर प्रतापराव ढाकणे यांना कसा पडला, याचे नवल वाटू लागले आहे.
हा मुद्दा प्रतापराव ढाकणे यांनी त्यांच्या संहितेनुसार हाताळला असता, तर नक्कीच स्थानिक लोकप्रतिनिधींची डोकेदुखी ठरला असता. तशी ही संधीच होती. परंतु हा मुद्दा आक्रमकपणाने हातळल्याने त्यांच्या हातातून तो सुटल्याचे दिसते. मात्र पाथर्डी शहरातील मुख्य रस्ता वेगाने व्हावा आणि तो दर्जेदार व्हावा ही सर्वसामान्यांची मागणी आहे. ती होताना दिसत नाही. त्यात काहींनी हप्ता न दिल्याने रस्त्याचे काम बंद पाडले. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांची अडवणूक आहे. प्रतापराव ढाकणे यांनी त्यावर आक्रमकपणे दिलेली प्रतिक्रिया ही सर्वसामान्यांचा संताप आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हे वर्षे निवडणुकांचे आहे. यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर वेगवेगळे गट पडले आहे. शरद पवार आणि अजित पवार हे गट आपआपल्या इच्छुक उमेदवारांना संधी देणार हे निश्चित आहे. यातून एकमेकांची कोंडी करण्याची संधी कोणी सोडणार हे देखील तेवढंच खरं! राज्यात सध्या भाजप महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, असे चित्र आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे. या लाटेवर अनेक जण स्वार होण्याच्या तयारीत आहेत. हे करताना विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना कोंडी पकडण्यासाठी काही मुद्दे कायद्याने लढल्यास ते हिताचे ठरणारे आहे. पाथर्डीतील हा मुद्दा देखील तसाच आहे. प्रतापराव ढाकणे यांनी अजूनही हा मुद्दा संयम दाखवून कायद्याने हाताळल्यास नक्कीच यश येईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अॅड. प्रतापराव ढाकणे (Pratprao Dhakne)यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी भीक मागो आंदोलन केले. यानंतर नगरपालिका इमारतीत आंदोलक पोहोचले. तिथे नगरपालिकेतील खुर्च्यांची मोडतोड झाली. याप्रकरणाची नगरपालिका प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यायला हवी होती.
नगरपालिका प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशी देखील याबाबत दखल घेतली गेलेली नाही. नगरपालिका गप्प राहणे म्हणजे, संशयाचे जाळे स्वतः भोवती निर्माण करून घेण्यासारखे आहे. यातच गेल्या दोन वर्षांपासून नगर पालिकेवर प्रशासक आहे. प्रशासक असला, तरी त्यावर सत्ताधाऱ्यांचे अंकुश आहे. विरोधक आंदोलन करतात निघून जातात. परंतु प्रतापराव ढाकणे यांचे आंदोलन थेट प्रशासनाला आव्हान देणारे ठरणारे आहे. हे आंदोलन प्रशासनाविरोधात असले, तरी यात लोकप्रतिनिधींवर निशाणा होता.
नगरपालिकेतील नुकसानीवर काय कारवाई करणार
या आंदोलनामुळे नगरपालिकेतील नुकसानीवर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने कारवाई केल्यास प्रशासनाला देखील हा मुद्दा अडचणीचा ठरणारा आहे. रस्त्या संबंधित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला तयार ठेवावी लागणार आहे. त्यामुळे विरोधक देखील प्रशासनाने कारवाई करावी म्हणून लक्ष ठेवून आहे. म्हणजे हा मुद्दा थेट कायद्याच्या कचाट्यात सापडेल आणि संपूर्ण चौकशी होईल. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचे या रस्त्याचा मुद्दा अवघड ठिकाणचे दुखणे बनला आहे.
(Edited by Sachin Waghmare)