Rohit Pawar, Ram Shinde News Sarkarnama
नगर

Rohit Pawar : रोहित पवार 'ईडी' कार्यालयात असताना आमदार शिंदे नेमके कोठे होते?

Political News : बारामती अ‍ॅग्रोच्या कारभारावरून आमदार पवार यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलवले होते.

Pradeep Pendhare

Nagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांच्याती राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार रोहित पवार हे बुधवारी 'ईडी' कार्यालयात चौकशीसाठी हजर होत असतानाच भाजप आमदार शिंदे हे नेमके कोठे आहेत, याची चर्चा होती. याबाबत विरोधी आमदार राम शिंदेंशी संपर्क साधला असता ते मतदारसंघाच्या बाहेर नियोजित दैनंदिन कामासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते नेमके कुठे आहेत ? यावर त्यांनी भाष्य टाळले.

बारामती अ‍ॅग्रोच्या कारभारावरून आमदार रोहित पवार यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बुधवारी बोलवले असून त्याचे तीव्र पडसाद मतदारसंघात उमटले आहेत. राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जात असून आमचा नेता लढणारा आहे. कोणाच्या दबावाला घाबरुन स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही अशा शब्दात कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईत देखील 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते ठाण मांडून आमदार पवार यांच्या समर्थनार्थ बसले आहेत.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना केंद्रीय 'ईडी'ने बारामती अ‍ॅग्रोच्या कारभारावरून चौकशीसाठी बुधवारी मुंबई येथे बोलावले आहे. सकाळी साडेदहा वाजता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेत खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्यासोबत कार्यालयात चौकशीसाठी रवाना झाले. त्यांच्या समर्थनार्थ मतदारसंघातील गावनिहाय कार्यकर्ते वाहनाने मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे. मुंबई येथील ईडी आणि राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आमदार पवार यांना समर्थन देणारे फलक हाती घेत ठाण मांडून बसले आहेत.

'(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमचा दादा पळणारा नाहीतर लढणारा आहे', 'ज्याला साथ सह्याद्रीची त्याला भीती कोणाची', 'जहाँ तुम बुलाओगे वहा मैं आऊंगा', 'तुफान का वारीस हु, तबाह कर के जाऊंगा', या आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेत मुंबईत धुमाकूळ घातला.

आमदार रोहित पवार यांनी शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि युवा वर्गाच्या प्रश्नांवर राज्य सरकारसह केंद्र सरकारला संघर्ष यात्रेत धारेवर धरले होते. यात्रेला मिळालेला प्रतिसाद तसेच राजकीय द्वेषापोटी त्यांचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा कारवाईने केला जात असल्याची प्रतिक्रिया मुंबई येथे कार्यकर्त्यांनी दिल्या. कर्जतमध्ये देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात निवेदन देत 'ईडी'च्या चौकशीचा निषेध केला.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT