MLA Samadhan Autade Sarkarnama
नागपूर

Samadhan Autade : शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून आमदार आवताडे आक्रमक; ठेकेदारावर गंभीर आरोप

Winter Session Nagpur : चेंबूरमधील शाळेतल्या 16 विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेतून विषबाधा...

Anand Surwase

Assembly Winter Session 2023 : नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी शालेय पोषण आहाराचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शालेय पोषण आहारातून चेंबूर येथील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले.

पोषण आहारातून विषबाधा होण्याचे प्रकार केवळ चेंबूरच नाहीतर राज्यभरात घडत असल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधताना आवताडे यांनी पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची वैधता, त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई आणि पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे, यावर आमदार आवताडे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले.

13 ऑक्टोबर 2023 रोजी चेंबूरमधील शाळेतल्या 16 विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेतून मिळणारे अन्न खाल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर घाटकोपरमध्येही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना उलटी मळमळ झाल्याची घटना घडली. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होणाऱ्या या गंभीर प्रकारावर अधिवेशात माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्याच मुद्द्यावर आमदार समाधान आवताडे यांनी देखील आवाज उठवत पोषण आहारातून विषबाधा होण्याचा प्रकार फक्त शहरी भागातील शाळेतच नाही तर संपूर्ण राज्यभरात घडत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले.

अध्यक्ष महोदय थोडसं ऐकलं तर बरं होईल..

पोषण आहारातून झालेल्या विषबाधा प्रकरणावर बोलण्यासाठी आमदार आवताडे उभे राहिले असता, सभागृहात वर्षा गायकवाड, मंत्री केसरकर (Deepak Kesarkar) आणि इतर सदस्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे आवताडे यांना आपला मुद्दा मांडण्यास अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, आवताडे यांना आपल्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी 'अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय थोडसं ऐकले तर बरं होईल; अशा शब्दात विनंती करावी लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आवताडे म्हणाले, चेंबूर येथील शाळेत ज्या प्रमाणे मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. असे प्रकार राज्यभरात घडत आहेत. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने संबंधित अन्न पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली आहे का? तसेच तो ठेकेदार अन्नसुरक्षा मानकानुसार पात्र होता का? तसेच या ठेकदाराकडून अन्न पुरवठा केल्यानंतर यापूर्वी असे प्रकार घडला आहे का? असे अनेक विविध प्रश्न उपस्थित केले. याशिवाय या पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या या ठेकेदाराने बोगस कागदपत्रे जोडून तर हा ठेका मिळवला नाही ना, अशी शंकाही आवताडे यांनी उपस्थित केली. याचबरोबर या पुढे असे प्रकार घडू नये म्हणून शालेय पोषण आहाराची गुणवत्ता दररोज तपासण्यात येणार आहे का? बाबत शासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबतही आमदार आवताडे यांनी विचारणा केली.

चेंबूर प्रकरणात पोलीस केस

शालेय पोषण आहाराच्या निकृष्टतेप्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या या विविध प्रश्नांवर उत्तर देताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चेंबूर घटनेप्रकरणी पोलीस केस करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच पोषण आहाराचा पुरवठा कोणत्याही ठेकेदारांकडून न होता, संस्थेमार्फत केला जातो. त्यांना सरकारकडून तांदळाचा पुरवठा केला जात असून इतर मसाले सारखे पदार्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. ग्रामीण भागात याची तपासणी करूनच ते वितरीत केले जाते. शहरी भागात देखील त्यांची तपासणी करण्यात येईल असे उत्तर केसरकर यांनी दिले.

फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर कारवाई

दरम्यान, चेंबर येथे पोषण आहारातून झालेल्या विषबाधा प्रकरणात 151 विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होते. मात्र त्यातील 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे नेमके या विद्यार्थ्यांना कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली हे फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत संबंधित अन्न पुरवठादारा विरोधात पोलीस केस करण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही  मंत्री केसरकरांनी स्पष्ट केले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT