Sunil Kedar
Sunil Kedar  Sarkarnama
नागपूर

तुम्ही आधी दोन लावा; पोलिस केस मी बघेन, सुनील केदार झाले आक्रमक...

निलेश डोये

नागपूर : काटोल येथे आढावा बैठकीत अपमान केल्याचे सांगत पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करणारे माजी आमदार आशिष देशमुख आणि कॉंग्रेसमधून निलंबित केलेले गज्जू यादव यांना सोबत घेऊन फिरणारे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी रविवारी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला. काॅंग्रेसशी बेईमानी करणाऱ्यांना गाडीतून खेचून आधी दोन कानाखाली लावा. त्यानंतर पोलिस केसचे काय ते मी बघून घेईन, असे केदार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षातून निलंबित केलेल्या गज्जू यादवांना सोबत घेऊन फिरणारे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यास मंत्री सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नाना गावंडे, उपाध्यक्ष किशोर गजभिये, युथ काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल सिरीया, कुंदा राऊत, सभापती नेमावली माटे यांच्यासह २०० वर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सिरिया यांनी आशिष देशमुख यांना पक्षातून बाहेर काढण्यात यावे, यासंदर्भात बैठकीत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या हिंगणा विधानसभा अध्यक्ष कुंदा राऊत यांनी अनुमोदन केले. दरम्यान लोंढे यांनी प्रस्तावावर मत मागितले. यावेळी ३० ते ४० टक्के कार्यकर्त्यांनी हात वर केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हा प्रस्ताव पारित करण्यात आला. विशेष म्हणजे देशमुख व राऊत हे दोघेही केदार विरोधक आहेत. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार प्रमुख आरोपी असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

देशमुख या संदर्भात केंद्रातील काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनाही भेटले होते. त्यानंतर केदारांच्या समर्थकांनी देशमुख भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ते गेले होते, असेही सांगण्यात येते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत देशमुख यांचे नाव प्रदेश सरचिटणीस म्हणून झळकले आहे. त्यानंतर देशमुख विरोधक आणखीनच सक्रिय व आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT