kishor Darade, chhagan bhujbal  Sarakrnama
नाशिक

Chagan Bhujbal : 'भुजबळ पुन्हा आमदार होणार नाहीत' : 'या' नेत्याने डागली तोफ

Arvind Jadhav

Nashik News : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद उभा केला असल्याची टीका विरोधक करीत आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्याविरोधात सर्वच विरोधक एकवटत आक्रमक झाले आहेत. त्यामध्ये आमदार असलेल्या दराडेबंधूंनी भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. भुजबळ येवल्यातील दौऱ्यावर आले असल्याने त्यांच्यावरील आरोप-प्रत्यारोपाचा कलगी-तुरा चांगलाच रंगला आहे.

येवल्यामध्ये विकासाच्या नावाखाली खोटे चित्र उभे केले गेले आहे. आता ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद उभा केला. इतर लोकप्रतिनिधींनी येवल्यासाठी केलेल्या कामांना कात्री लावण्यात येते. मंत्री छगन भुजबळ यांचे दिवस भरले असून, ते येवल्यातून पुन्हा आमदार होणार नाहीत, अशी खरपूस टीका विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी केली.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या विकासाला बांधून ठेवले. साधे मार्केटचे काम ते पूर्ण करू शकले नाहीत. येवल्यात भुजबळांमुळे एका सर्वसामान्य व्यक्तीस रोजगार मिळतो, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहनच दराडे यांनी केले.

ओबीसीनेते असल्याचे सांगणाऱ्या भुजबळांनी ओबीसी समाजातील अठरापगड जातींसाठी नेमकी काय काम केले, हे त्यांनी दाखवून द्यावे. आम्हीसुद्धा ओबीसी असून, एका विशिष्ट समूहातील व्यक्तींना सोबत घेतले, म्हणजे अख्खा ओबीसी समाजाचा त्यांना पाठिंबा आहे, असे चित्र भुजबळांनी रंगवले आहे. मी आणि माझा भाऊ विधान परिषदेत आमदार आहोत. आमचे कार्यक्षेत्र नसताना आम्ही येवल्यासाठी तब्बल ३०० ते ३५० कोटी रुपयांचा निधी आणला. रस्ते, आधुनिक बस स्टॅण्ड आमच्या निधीतून झाले. एवढेच नव्हे, तर शिवसृष्टी ही संकल्पना आमची होती. निधीही आमचा आहे. पण भुजबळ या कामांचे श्रेय लाटून मोकळे होत असल्याचा आरोप दराडे यांनी केला आहे.

आम्ही भूमिपुत्र आहोत. या शहराशी आणि शहरवासीयांचे आमचे नाते वेगळे आहे. शहरवासीयांनाही परठिकाणाहून होणाऱ्या भ्रामक विकासाचा वीट आला आहे. त्यामुळे यापुढे भुजबळ आमदार म्हणून निवडून येणार नाहीत, असा दावाही दराडे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाआघाडीचा उमेदवार कोणीही असो, विजय निश्चित आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यास भुजबळ सातत्याने विरोध करतात. त्यामुळे मराठा समाजाने त्यांचा उघड विरोध करण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम अथवा ओबीसीसाठी काहीच झालेले नाही. त्यामुळे तेसुद्धा भुजबळांपासून दूर गेले आहेत. भुजबळांना याची जाणीव आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच होईल, असे दराडे यांनी स्पष्ट केले.

विरोधक तुटून पडणार...

भुजबळविरुद्ध सर्व विरोधक असे चित्र आता येवल्यात निर्माण झाले आहे. किशोर दराडे आणि त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे विधान परिषेदेत आमदार आहेत. यातील नरेंद्र दराडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात, तर किशोर दराडे हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते ठाकरे यांच्यासोबत राहण्याची शक्यता अधिक आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून माणिकराव शिंदे यांनीसुद्धा भुजबळांसमोर आव्हान निर्माण केले आहे. येवला विधानसभा मतदारसंघात पहिली निवडणूक लढवल्यापासून भुजबळांना प्रथमच एवढ्या भक्कम विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT