Nashik News : देशातील राजकारणात सध्या अयोध्येचे राम मंदिर, तर राज्यात नाशिक येथील काळारामाचे मंदिर केंद्रस्थानी आहे. या वर्षीच्या पहिल्याच दिवसापासून ऐतिहासिक काळाराम मंदिर व्हीआयपी दौऱ्यांनी गजबजून गेले आहे. या ठिकाणी येत्या काळात १२ जानेवारीला पंतप्रधान मोदीदर्शनाला येण्याची शक्यता मोठी असून, त्यापाठोपाठ २२ जानेवारीला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा काळाराम मंदिरात दर्शन घेऊन गोदाआरती करतील.
गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी गतआठवड्यात श्री काळारामाचे दर्शन घेतले. या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भाजपच्या आमदारांच्या फौजफाट्यासह काळाराम मंदिरात पोहोचले.
१२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेण्यास येणार आहेत. ते गोदाआरतीही करतील, तर २२ तारखेला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा काळाराम मंदिरात दर्शन घेऊन गोदाआरती करतील. एकूणच देशातील राजकारणात अयोध्येचे राम मंदिर, तर जिल्ह्यात काळारामाचे मंदिर केंद्रस्थानी आले आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमासाठी येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. सुरक्षा कारणास्तव पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात येणार की नाही, याबाबत संभ्रम होता. आता मात्र घडामोडी वेगाने घडत आहेत. विशेष सुरक्षा दलाने (एसपीजी) रामकुंडासह काळाराम मंदिराच्या परिसराची पाहणी केली. एसपीजीच्या पाहणीबरोबरच येथील अतिक्रमणे प्रशासनाने काढून टाकली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
२७ व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबादरोड हायवेवर रोड शो आणि त्यानंतर उद्घाटन कार्यक्रम करून मोदी मुंबईला रवाना होतील, असा ढोबळ कार्यक्रम सुरुवातीस आखला गेला होता.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गोदाआरतीसह काळाराम मंदिरात दर्शनासाठी पंतप्रधानांनी यावे, असा आग्रह धरला. हा आग्रह पंतप्रधानांनी स्वीकारला असून, १२ तारखेला मोदी रोडशोनंतर थेट रामकुंडावर दाखल होतील. गोदाआरतीसाठी ते दहा मिनिटे थांबतील. त्यानंतर लागलीच काळाराम मंदिरात पोहोचतील. तिथे २५ मिनिटांमध्ये आरती व पूजा आटोपून ते तपोवनातील कार्यक्रमस्थळी पोहोचतील. दरम्यान, रामकुंड परिसरातील इमारतींवर चित्रकला महाविद्यालयाचे रामायणातील वेगवेगळी चित्रे साकारत आहेत.
(Edited by sachin waghmare)