Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
नाशिक

Maratha Reservation : उपोषणाआधी जरांगेंचा भुजबळांच्या बालेकिल्यात फेरफटका; मुख्यमंत्री नाशिकमध्येच

Arvind Jadhav

Nashik News : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील विस्तव जात नाही. त्यातच आता मनोज जरांगे पाटील गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून, मराठा आरक्षण आणि भुजबळ यांच्यावर ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाशिकला येणार असून, नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची भेट होणार काय याचीही उत्सुकता सर्वांना आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा देत लढाईच्या तिसऱ्या टप्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. त्यानुसार गुरुवारी (दि.8) जरांगे पाटील नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि जरांगे पाटील एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

ओबीसी एल्गार परिषदेत भुजबळांनी आपण 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे जाहिर केले होते. याच मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचेही पडसाद उमटले होते. तर, मनोज जरांगे पाटील बजेटमधूनही आरक्षण मागत असल्याची उपहासात्मक टीका देखील भुजबळांनी केली होती. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राजीनामा द्या, नाही तर समुद्रात उडी मारा, असे म्हणत भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते.

आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. या तिसऱ्या लढाईच्या टप्यात त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, उद्या सकाळी 7 वाजेपासूनच त्यांच्या नियोजीत कार्यक्रमांना शहरातूनच सुरूवात होईल. नाशिक ते साल्हेर किल्ला या प्रवासादरम्यान सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचे दिंडोरी, वणी, कळवण, देवळा, सटाणा आदी तालुक्यांमध्ये स्वागत करण्यात येणार आहे. साल्हेर या दरम्यान ते सप्तश्रृंगी गडावर दर्शनाला जातील. तसेच बागलाण तालुक्याचे ग्रामदैवत यशवंतराव महाराज मंदिरात सुद्धा ते दर्शन घेणार आहेत. 11 वाजता साल्हेर किल्ल्यावरील कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्या भेटीची उत्सुकता

महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे 34 वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde ) यांच्या हस्ते होणार आहे. सांयकाळी चार वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, मनोज जरांगे पाटील सुद्धा उद्या नाशिकमध्ये आहेत. साधारणत: 11 वाजेपर्यंतचे जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची भेट होणार काय, अशीही चर्चा सुरू आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT