seema hire, sonaliraje pawar  Sarkarnama
नाशिक

Bjp News : आमदार सीमा हिरेंचं टेन्शन वाढणार; सोनालीराजेही खोचणार पदर

Arvind Jadhav

Nashik News : आगामी काळात लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये भाजपने निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. त्यासाठी काही जणांना निवडणुकीपूर्वी पक्षात घेत मोठी जबाबदारी भाजपने दिली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, म्हणून नाही तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम सुरू केले आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारली की कोणताही प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका भाजपच्या जिल्हाध्यक्षा सोनालीराजे पवार यांनी व्यक्त केली. नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या आमदार सीमा हिरे प्रतिनिधित्व करतात, तर सोनालीराजे पवार पश्चिमसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार सीमा हिरेंचं टेन्शन वाढणार आहे.

मूळ सुरगाणा येथील सोनालीराजे पवार (Sonaliraje Pawar) गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईक असलेल्या सोनालीराजे पवार यांचे नाव गत विधानसभा निवडणुकीवेळी अचानक चर्चेत आले होते. उदयनराजे यांच्यासाठी जोर लावत असल्याची चर्चा असताना पक्षाने सीमा हिरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. यानंतर सोनालीराजे पवार यांनी आपले काम सुरूच ठेवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वी त्यांनी पक्षात प्रवेश केला. यानंतर लागलीच त्यांच्याकडे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या तयारीबाबत पवार यांना विचारले असता, पक्ष देईल ती जबाबदारी समर्थपणे करण्याची माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझी ताकद एका विधानसभा मतदारसंघासाठी नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी वापरणार असल्याचे स्पष्ट करताना जिल्ह्यातील महिलांना पक्षाशी जोडण्याचे महत्त्वाचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाल्या. गत निवडणुकीवेळीसुद्धा अशाच अफवांचा बाजार होता. त्याकडे दुर्लक्ष करीत मी माझ्या कामावर फोकस ठेवणार असल्याचा दावा त्यांनी केला.

म्हणून सुरगणा ते नाशिक

जिल्ह्यातील सुरगणा हे पवार यांचे मूळ ठिकाण असून, ते राखीव गटात मोडते. पवार खुल्या वर्गात मोडतात. त्यामुळे सुरगणा सोडून पवार यांनी आपले लक्ष नाशिककडे वळवले आहे. गेल्या पंचवार्षिकपासून, विविध सामाजिक कार्याद्वारे त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात संपर्क वाढवला आहे.

(Edited by sachin waghmare)

SCROLL FOR NEXT