Malegaon Tenders Scam News: मालेगाव महापालिकेच्या गैरकारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख यांनी गंभीर आरोप केला आहे. वर्षभरातील सर्व टेंडर सत्ताधाऱ्यांनी मॅनेज केले, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपातून सत्ताधारी अर्थात मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मालेगावचे शहर अध्यक्ष माजी आमदार असिफ शेख यांनी महापालिकेतील सर्व टेंडर मॅनेज करण्यात आले आहेत. सत्ताधारी पक्षाने खास लोकांना हे टेंडर देऊन मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात आपल्याकडे पुरावे असून धडधडीत गैरकारभार होत आहे. असे असताना सत्ताधारी लोक अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, असे ते म्हणाले.
मालेगाव महापालिकेच्या कारभाराविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आसिफ शेख सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी नुकतेच एक निवेदन देऊन महापालिकेत गेल्यावर्षभरात काढण्यात आलेले शासनाच्या निधीतील आणि महापालिकेच्या तरतुदीतील सर्व निविदा मॅनेज करण्यात आले आहेत. या निविदा मंजूर करताना ठेकेदार आधीच ठरविण्यात आले होते. या ठेकेदारांनी स्वतःच तीन निविदा दिल्या. त्यातील त्यांची स्वतःची निविदा मंजूर करण्यात आली. या कामांमध्ये कुठेही गुणवत्ता नाही. जवळपास सहा टक्के कमिशन देण्यात आलेले आहे.
याविषयी कंत्राटदारांनी देखील तक्रारी केल्या आहेत. तरीही महापालिकेचे तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी, शहर अभियंता कैलास बच्छाव आणि निविदा समितीचे अध्यक्ष सुहास जगताप यांना सत्ताधारी मंडळींनी अभय दिले आहे. त्यात महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने याबाबत तातडीने निष्पक्ष चौकशी व्हावी.
मालेगाव महापालिकेत सध्या प्रशासक आहेत. प्रशासक राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षाच्या अर्थात स्थानिक मंत्री दादा भुसे यांच्या नियंत्रणाखाली काम करीत आहेत. राज्यभर हीच पद्धती असल्याने, राष्ट्रवादीचे आमदार असिफ शेख (Asif shaikh) यांनी प्रशासनावर केलेला आरोप अप्रत्यक्षरीत्या मंत्री भुसे यांना उद्देशून मानला जातो. यासंदर्भात शेख यांनी राज्य सरकारमधील सत्ताधारी वर्गाने मालेगाव महापालिकेत नियमबाह्य पद्धतीने निविदा मॅनेज केल्या आहेत. त्यांच्या दबावाखालीच सर्व कामकाज होते, असा आरोप केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना थेट लक्ष केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यासंदर्भात माजी आमदार शेख म्हणाले की, सत्ताधारी गटाच्या दबावातून होणाऱ्या या कामकाजामुळे अनेक वाद देखील होत आहेत. शहीद अन्सारी या कंत्राटदाराने निविदा भरली असता, सत्ताधाऱ्यांच्या विश्वासातील रिजवान खान या कंत्राटदाराने त्याला मारहाण करून निविदा मागे घ्यायला लावली. याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी तिचे रूपांतर अदखलपात्र तक्रारीत केले. सत्ताधारी पक्ष महापालिकेच्या कामकाजात अवाजवी हस्तक्षेप करून गैरकारभाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अप्रत्यक्षरीत्या मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर आरोप करण्यात आल्याने यापुढे मंत्री भुसे अथवा प्रशासन त्याला काय उत्तर दिले जाते याची उत्सुकता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय वाद अधिक टोकाला जाण्याची शक्यता आहे.
(Edited by: Sachin Waghmare)