Nitesh Rane Sarkarnama
नाशिक

Nitesh Rane : मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणणे नितेश राणेंना भोवणार; नोटीस बजावणार

Arvind Jadhav

Nashik News : मालेगावमधील वीज चोरीचा थेट अतिरेकी कारवायांशी संबंध जोडून मालेगावला मिनी पाकिस्तान संबोधणे आमदार नितेश राणे यांच्या अंगलंट येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी आमदार शेख असिफ शेख रशीद यांनी वकीलामार्फत नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी माफी मागा, अन्यथा तुमच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत मिनी पाकिस्तानमध्ये (मालेगाव) ३१९ कोटी रूपयांची वीज चोरी झाल्याचा आरोप केला. हा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जातो, असा आरोपही राणे यांनी केला होता. हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेणाऱ्या राणे यांच्या विधानामुळे मालेगावमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत बोलताना माजी आमदार शेख यांनी सांगितले की, मालेगाव फक्त मुस्लीमांचे नाही. येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. वीज चोरीचा प्रकार संपूर्ण मालेगावमध्ये झाला. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, याचे कनेक्शन जोडून मालेगावला थेट मिनी पाकिस्तान कसे संबोधले गेले, असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) मालेगावचे आहेत. वास्तविक राणेंना विधानसभेत जाब विचारून त्यांनी कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र, 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' असे धोरण पालकमंत्री राबवत आहेत. मालेगाव आणि पाकिस्तानचा आतापर्यंत काडीचाही संबंध नाही. देशातील मुस्लीमांनी त्यावेळी भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता. मालेगावमध्ये कधी दहशतवादी सापडले नाहीत की तसे कनेक्शनही पुढे आले नाही. मात्र, राणे जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याविरोधात ए. ए. खान यांच्यामार्फत आमदार राणेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. राणेंनी सात दिवसात माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा शेख यांनी दिला आहे.

पोलिसांकडे तक्रार पण काहीच कारवाई नाही

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो. तिथे रितसर तक्रार अर्ज दिला. मात्र, मागील सात दिवसांत काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत नोटीस पाठवली आहे. राणेंनी माफी मागितली नाही तर आम्ही कोर्टात खटला दाखल करू, असे शेख यांचे वकील ए. ए. खान यांनी स्पष्ट केले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT