Samir Bhujbal Sarkarnama
नाशिक

Samir Bhujbal : समीर भुजबळ मुंबईत, तर नाशिकमध्ये कोण?

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव

Nashik News :

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मुंबईची जबाबदारी दिली आहे. मुंबईमध्ये कमकुवत असलेला पक्ष मजबूत करण्यासाठी नियुक्ती करताना समीर भुजबळ नक्कीच पक्षाचे बळ वाढतील, असा विश्वासही अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समीर भुजबळांचे नाशिक कनेक्शन कट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात अजित पवारांनी मुंबईतील पक्षस्थिती आणि समीर भुजबळांची जबाबदारी स्पष्ट केली. हातात वेळ कमी असल्याने आठवड्यातील एक दिवस राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार मुंबईसाठी वेळ देतील, हे स्पष्ट करताना समीर भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत लवकरच दिसेल, असे अजित पवारांनी सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही मुंबईतील ताकद वाढली तर राज्यात परिस्थिती बदलते, याकडे लक्ष वेधले. समीर भुजबळ यांनी कमी वेळेत मुंबईत चांगले काम केल्याने सभागृहात खरे कार्यकर्ते जमा झाले, असे म्हणत त्यांनी भुजबळांचे कौतुक केले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समीर भुजबळांची मुंबईत आवश्यकता असल्याचे विषद केले. भुजबळ ज्या पद्धतीने मुंबईत काम करीत आहेत, त्याप्रमाणे येत्या निवडणुकीत पक्षाचे तिप्पट नगरसेवक कार्यरत होतील, अशी अपेक्षा तटकरेंनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, समीर भुजबळांनी आव्हान स्वीकारल्याचे सांगितले. हे वर्ष निवडणुकीचे असून मुंबईत पक्षाची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीला एक लोकसभा दिली, तर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघात आमदार आणि महापालिकेत ७५ जागा निवडून आणू, असा शब्दच मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी पक्षाला दिला आहे.

...तर नाशिक लोकसभेसाठी नवा उमेदवार

पक्षवाढीसाठी समीर भुजबळांकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. यातून समीर भुजबळ बाहेर पडतील का, असा प्रश्न समोर येतो. दुसरीकडे लोकसभेसाठी नवा आणि कोणतेही आरोप नसलेला चेहरा हवा, असा आग्रह अजित पवार यांच्याकडून होतो आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून नवा चेहरा दिला जाऊ शकतो. असे असले तरी निवडणूक लढलो तर नाशिकमधूनच, असे समीर भुजबळ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार भविष्यात आपले पत्ते कसे उघड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT