Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
नाशिक

Sharad Pawar : ठाकरे गटाची पहिली परीक्षा शरद पवारच घेणार!

Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी कार्यकर्ते शरद पवारांकडे आग्रही

Arvind Jadhav

Nashik News : राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला एकापाठोपाठ एक धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. इंडिया आघाडीचे काहीही झाले तरी अद्याप राज्यात त्याचे पडसाद पडलेले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अद्याप सोबत आहेत. मात्र, जागावाटपाची प्रक्रिया या तिन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरते आहे. राष्ट्रवादीसाठी अनुकूल वातावरण असल्याने नाशिकची जागा अपेक्षेप्रमाणे आपणच लढवावी, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येते आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाची परीक्षा शरद पवारच घेतील, हे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते.

नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिवेशन आणि त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमुळे वातावरणनिर्मिती झाली. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार, असे चित्र निर्माण झाले. मात्र, असे असले तरी शिवसेनेची पहिली परीक्षा राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) घेणार, अशी चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीसाठी अनुकूल वातावरण असल्याने नाशिकची जागा अपेक्षेप्रमाणे आपणच लढवावी, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येते आहे. तुम्ही तयारीत राहा, जागावाटपावेळी पाहू, असा शब्द शरद पवारांनी दिलेला असल्याने नाशिक लोकसभेसाठी ठाकरे आणि पवारपैकी कोणाची सरशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूंनी आक्रमक आहेत. नाशिकला नुकतेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. अधिवेशानापाठोपाठ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. त्यात त्यांनी भाजपासह विरोधकांवर तोंडसुख घेताना लोकसभेचे रणशिंग फुंकले.

यानंतर शिवसेनेचा जोष वाढला. या अधिवेशनापूर्वीपासूनच शिवसेनेचे इच्छुक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मतदारसंघात गाठीभेटी सुरू होत्या. आता त्यात वाढ झाली आहे. असे असले तरी शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मात्र नाशिक लोकसभा आपलीच, असा नारा दिला जातो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा व्यापक सर्व्हे करण्यात आला असून, त्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे. पक्षाकडून गोकुळ पिंगळे उमेदवारी करण्यास सज्ज आहे. त्यामुळे जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षालाच (शरद पवार गट) मिळायला हवा, अशी आग्रही मागणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे करण्यात आली आहे. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा पुढचे बघू, असा संदेशसुद्धा पवार यांनी दिल्याचा दावा राष्ट्रवादी गटाकडून करण्यात येतो.

भाजप की शिंदे गटाला जागा मिळणार, यावरून रस्सीखेच

दरम्यान, या जागेवर पूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच लढत व्हायची. मात्र, आता हे दोन्ही पक्ष गट म्हणून एकत्र आले आहेत. विरोधात भारतीय जनता पक्ष लढणार, की शिंदे गटाला ही जागा मिळणार, यावरसुद्धा रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो आणि जय-विजय कोणाचा होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. पण, निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाची परीक्षा शरद पवारच घेतील, हे सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येते.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT