Congress Secular Front : भिवंडीमध्ये बहुमतासाठी काँग्रेसला आणखी 4 नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप व शिवसेना यांच्यासोबत जायचे नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्या भूमिकेशी काँग्रेसने तडजोड केली नाही. आता नारायण चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले आहेत. भिवंडीचा महापौर व उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
टिळक भवन येथे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यासह माध्यमांशी ते बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, की भाजपचा त्याग करून सेक्युलर फ्रंटसोबत येण्याचा निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते. आज त्यांनी काही सहकाऱ्यांसह भाजपचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला व काँग्रेसप्रणित आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे, ही काँग्रेसची भूमिका आहे.
24 दिवसांत इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली. आता कोंडी फुटली असून भिवंडीचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तातडीने निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सर्वांशी चर्चा करतील व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 व भाजप सोडून आलेले 9 नगरसेवक मिळून भिवंडीत सत्ता स्थापन केली जाईल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेक्युलर फ्रटंची स्थापन करून सत्ता स्थापण्याचा प्रयत्न मागील 24 दिवसांपासून सुरू होता. समाजवादी पक्षाशी चर्चा केली; पण त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे, असे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.
भाजपने महापौर पदासाठी आधी नारायण चौधरी यांचे नाव पुढे केले होते. मात्र शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारीत बदल करत स्नेहा मेहुल पाटील यांना संधी दिली. या निर्णयामुळे नारायण चौधरी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यांच्या गटातील 9 नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेत काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.