MP Amol Kolhe Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Lok Sabha Election : अमोल कोल्हे 'अ‍ॅक्शन मोड'वर; गाव, गोठ्यास भेट अन् 'एसटी'त उभा राहून प्रवासही!

MP Amol Kolhe : उमेदवारी निश्चित झाल्याने अमोल कोल्हे सक्रिय झाल्याचे बोलले जात असून, सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मिळाल्याचे दिसत आहे. कारण सध्या ते त्यादृष्टीने अ‍ॅक्शन मोडवर आले असून गावभेटी, दौरे त्यांनी सुरू केले आहेत. त्यात आज सकाळी (ता.२०) त्यांनी खेड तालुक्य़ाच्या दौऱ्यात कुरुळीत गोठ्याला भेट दिली अन् नंतर चक्क एसटीने प्रवास केला. त्यामुळे एसटी प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

तर यावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. निवडणूक जवळ आल्याने आता मूळ अ‍ॅक्टर असलेले खासदार कोल्हे आता अ‍ॅक्टिंग करीत असल्याचेही काही नेटकरींनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार अमोल कोल्हे हे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना भेटीसाठी दौऱ्यावर होते. त्याची सुरुवात सकाळीच त्यांनी कोहिंडे बुद्रुक येथील मारुती मंदिरासमोर ग्रामस्थांची बैठक घेऊन केली. त्यानंतर ते पाईटला जाणार होते. यासाठी त्यांनी आपला वाहन ताफा सोडला अन् ते येणवे-राजगुरुनगर एसटी बसमध्ये कोहिंडे येथून बसले, तर खुद्द आपले खासदार पाहून एसटी प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

एसटीत आमदार, खासदारांना मोफत प्रवास आणि रिझर्व्ह सीट असूनही त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट काढून उभे राहत प्रवास केला. एसटी वेळेवर येते का अशी विचारणा त्यांनी प्रथम प्रवाशांना केली. शिवाय ज्येष्ठांची विचारपूसही केली. कोहिंडे ते पाईट फा़ट्यापर्यंतच्या काही मिनिटांच्या प्रवासात त्यांनी एका चौथीतील विद्यार्थ्याशीही संवाद साधला. एका तरुणाला त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह या वेळी आवरला नाही.

खूप वर्षांनी लालपरीने प्रवास करण्याचा योग आल्याने बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी या एसटी प्रवासावर दिली. प्रवास केलेल्या एसटीच्या वाहक या महिला असल्याची बाब सुखावणारी होती, असे ते म्हणाले. हा गावभेट दौरा सुरू होण्यापूर्वी त्यांनी कुरळी गावचे प्रसिद्ध गाडामालक बाळासाहेब कड यांच्या गोठ्याला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी गोठ्यातील बैलांच्या अंगावर हातही फिरवला, या दोन्ही घटनांच्या पोस्टवर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

काहींनी याला निवडणूक जवळ आल्याने अॅक्टर खासदार असणाऱ्या कोल्हेंची अॅक्टिंग सुरू झाल्याचा टोला लगावला, तर एकाने खासदारांना एसटीत मोफत प्रवास व सीटही राखीव असल्याकडे लक्ष वेधले, तर काहींनी खासदार कोल्हेंच्या एसटी प्रवासामुळे ११ वेळा आमदार होऊनही एसटीनेच ये-जा करणाऱ्या शेकापचे गणपतराव देशमुख यांची आठवण झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT