pimari chinchvad sarkarnama
पिंपरी चिंचवड

उबेर बाईक रायडरला रिक्षाचालकांची मारहाण, मोबाईल फोडला ; व्हिडिओ व्हायरल

उत्तम कुटे - सरकारनामा वृत्त

पिंपरी : ओला,उबेरच्या ऑनलाईन टॅक्सी,ऑटो सेवेने ती ऑफलाईन देणाऱ्या रिक्षा (autorickshaw driver) आणि टॅक्सीचालकांच्या धंद्यावर गदा आली आहे. त्यात आता उबेरने बाईक (uber bike rider) शेअर सेवाही सुरु केल्याने या दोघांतील संघर्ष मुद्यावरून आता गुद्यावर आला आहे. त्यातून हिंजवडीजवळ पुनावळे येथे दोन उबेर बाईकचालकाला तीन रिक्षाचालकांनी नुकतीच मारहाण केली. एवढेच नाही,तर त्यातील एकाचा तो ज्याव्दारे हा व्यवसाय करीत होता, तो मोबाईल फोडायला रिक्षाचालकांनी भाग पाडले.

या घटनेमुळे अगोदरच रिक्षाचालक आणि शेअर बाईकची सेवा देणाऱ्यांतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाईकसेवा बेकादा असल्याचे रिक्षाचालक संघटनांचे म्हणणे आहे. त्यातून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील (pimari chinchvad) काही अशा या बाईकस्वारांविरुद्ध आरटीओने नुकतीच जप्तीची कारवाईही केली आहे. उबेर आणि ओला कंपन्याविरुद्धही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. पण, त्या कधीही,कुठेही आपली वातानूकुलित सेवा देत असल्यामुळे त्यांना वाढता प्रतिसाद मिळतो आहे, तर, दुसरीकडे रिक्षाचालकांनी जवळचे भाडे नाकारण्यासह इतर कारणांमुळेही प्रवासी ऑनलाईन प्रवासी सेवेकडे वळलेले आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन रिक्षा, टॅक्सी सेवेतील संघर्ष आणखी वाढला तो ऑनलाईन बाईक शेअर पद्धतीने. त्यामुळे एकटादुकटा प्रवासीही ऑनलाईनच्या टॅक्सी वा रिक्षापेक्षा कमी भाडे असलेल्या ई बाईक सेवा पसंत करू लागला. त्यामुळे पोटावरच पाय आल्याने रिक्षाचालक संतापले आहेत. त्यातून त्यांनी एका उबेर बाईकचालकाला नुकतीच (ता.४) पुनावळे येथे मारहाण केली. मारहाण करून तो ज्याव्दारे व्यवसाय करीत होता तो मोबाईलच फोडून टाकला. पुन्हा उबेर बाईक चालक काम करताना दिसला, तर जीवे ठार मारू,अशी धमकीही दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तीन रिक्षाचालकांना अटक केली. बाबुराव शामराव पांचाळ (वय ४५), त्याचा भाऊ शरणबसप्पा (वय ३६) आणि हनुमंत बिभीषण माने (वय २३,तिघेही रा. पुनावळे) अशी त्यांची नावे आहेत.त्यांनी रीतसर उबेरच्या अॅपवरून फिर्यादी अंकुश कृष्णा सुर्यवंशी (वय २६,रा. नवी सांगवी) आणि उत्तम भास्कर कर्डिले या दोघा उबेर बाईकचालकांना घटनास्थळी बोलावून घेतले.

''आम्ही उगीच रिक्षाचे परमिट काढतो का, तू आमचे सीट घेऊन जातो,'' असे म्हणत आरोपींनी या दोघांना मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. एवढेच नाही,तर फिर्यादीचा मोबाईल मोठा दगड त्यावर टाकून फोडण्यास त्यांनी भाग पाडले. आईबहिणीवरून वाईट शिवीगाळ केली. त्यामुळे तेथून जीव घेऊन पळालेल्या सुर्यवंशीने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. भांडण सोडावयास गेले, तर पोलिसांनी आपल्यालाही आरोपी करून पकडले, असे माने यांचे म्हणणे आहे. तर, फिर्यादीने त्यांचे नाव घेतल्याने कारवाई केल्याचे या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस नाईक डामसे यांनी सरकारनामाला सांगितले.

हिंसेचं समर्थन नाही..

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आपली भूमिका सोमवारी (ता. ७)जाहीर केली. महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड पदाधिकारी अशाप्रकारे चुकीचं वागणार नाहीत.कारण आम्ही हिंसेचे कधीही समर्थन करत नाही, असे सांगितले. रिक्षाचालक,मालकांनी टू व्हीलर बाइकचालकांना मारहाण करू नये. कायदा हातात घेऊ नये.संयम सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकार आपल्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरिबांना आपापसात लढवतआहे. केंद्र व राज्य सरकार या धोरणास जबाबदार असून त्यांनी तातडीने बेकायदेशीरपणे सुरू असलेली टू व्हीलर बाईक बंद करावी अशी मागणी त्यांनी केली.अन्यथा १८ तारखेनंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील कांबळे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT