Ajit Pawar Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar News: अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रम घेणं झालं कठीण; नेमकं कारण काय ?

उत्तम कुटे

Pimpri News: मराठा आरक्षणाचा लढा दिवसागणिक तीव्र होत चालला आहे. त्यासाठी आमदार, खासदार, मंत्री अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींना अनेक गावांत य़ेण्यास बंदी घातली आहे. गावबंदीचे हे लोण आज शहरात पोचले. पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाने सर्वपक्षीय नेत्यांना शहर बंदीची घोषणा बुधवारी केली.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांचे उद्योगनगरी हे प्रिय शहर आहे. मात्र, त्यांचाही कार्यक्रम इथे होऊ देणार नाही, असा इशारा मराठा मोर्चाने आज दिला. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन शहरात पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या चाळीस दिवसांच्या मुदतीत म्हणजे मंगळवार पर्यंत ते राज्य सरकारने न दिल्याने जरांगे आजपासून अंतरवाली सराटी (ता.अंबड,जि.जालना) येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चाने आजपासूनच पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा साखळी उपोषण सुरु केले.

यावेळी मराठा मोर्चाने वरील पुढारी बंदीचा निर्णय घेतला. त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. जरागेंच्या सुचनेनुसार ही बंदी सुरु केली असून ती गावाबरोबर आता शहरातही करण्याची गरज मराठा मोर्चाचे मारुती भापकर यांनी प्रतिपादित केली. मात्र, सर्वपक्षीय घटनात्मक पदावरील व्यक्तींना ही बंदी असली, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी पहिल्याच दिवशी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा आंदोलकांना जाहीर केला. याअगोदर अंतरवालीतच जरांगे यांनी आमरण उपोषण केले, तेव्हाही पिंपरीत मराठा मोर्चाने साखळी उपोषण करीत त्यांना पाठिंबा दिला होता.

अंतरवालीत पोलिसांनी उपोषणकर्तेच नाही, तर तेथे जमलेल्या आबालवृद्धांवर बेछूट लाठीमार केल्याने हा प्रश्न पुढे चिघळला. त्याचे पर्यावसन सरकारला अल्टिमेटम देण्यात झाले. पण, त्यांनी ते न पाळल्याने पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

दिलेल्या मुदतीत आरक्षण न देऊन जरांगेंचीच नाही, तर सकल मराठा समाजाची राज्य सरकारने फसवणूक केली असल्याने त्या निषेधार्थ आणि जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सतीश काळे, वैभव जाधव, लहू लांडगे, मिरा कदम, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, प्रतिभा भालेकर, ज्योती जाधव यांच्यासह अनेकांनी पहिल्या दिवशी उपोषण केले.

यावेळी मानव कांबळे, सचिन चिखले, मारुती भापकर, प्रकाश जाधव, अजिज शेख, अँड.वंदना जाधव, अँड.लक्ष्मण रानवडे, काशिनाथ जगताप, सतिश चांदेरे धनाजी येळकर, राजन नायर यांनी मनोगत करीत या उपोषणाला पाठिंबा दिला.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT