Sunil Shelke deputy speaker opportunity Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Sunil Shelke News: मावळला पुन्हा ‘लाल दिवा’? राष्ट्रवादीच्या आमदाराला विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची संधी!

NCP MLA Sunil Shelke News: सुनील शेळके यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसे झाल्यास मावळ तालुक्याला तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’ मिळू शकतो.

सरकारनामा ब्युरो

विजय सुराणा

Maval Politics: मावळच्या राजकारणात सध्या एका मोठ्या राजकीय चर्चेने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसे झाल्यास मावळ तालुक्याला पुन्हा एकदा ‘लाल दिवा’ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील आगामी राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षांतर्गत बदलांच्या पार्श्वभूमीवर शेळके यांच्या नावाला विशेष महत्त्व मिळत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आहे. मात्र पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी नेतृत्वाला संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाच्या बदलांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांचे नाव आघाडीवर आल्याची चर्चा आहे.

मावळ तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर एकेकाळी हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, भाजपने रूपलेखा ढोरे यांना उमेदवारी दिल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली. त्यानंतर भाजपने मजबूत संघटन उभारले आणि बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद आणखी वाढली. भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मावळला राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख मिळाली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. अखेर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आणि त्या निर्णयाने मावळच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. पहिल्याच निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाची मजबूत सत्ता उभी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे.

मावळच्या राजकीय इतिहासात यापूर्वी मदन बाफना आणि बाळा भेगडे या दोन नेत्यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. आता सुनील शेळके यांच्या नावाची विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाल्याने मावळमध्ये पुन्हा राजकीय उत्सुकता वाढली आहे. उपाध्यक्षपद हे मंत्रिपदाइतकेच प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने, शेळके यांच्याकडे ही जबाबदारी आल्यास मावळच्या राजकारणात आणखी एक मोठा अध्याय लिहिला जाईल, अशी चर्चा रंगत आहे.

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी मावळमध्ये “सुनील शेळकेंना खरंच लाल दिवा मिळणार का?” याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT