Pimpri Chinchwad News , PCMC  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad News : सर्वपक्षीयांच्या विरोधामुळे 'उपयोगकर्ता' शुल्काचे भूत पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवरून उतरणार?

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा हाताळणी व व्यवस्थापनासाठी वर्षाला घरटी ७२० रुपये उपयोगकर्ता शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, राज्य सरकारने चार वर्षापूर्वी घेतलेल्या या निर्णयाची आता दंडासह अंमलबजावणी करण्यास विरोध करीत ही वसुली रद्द करण्याची मागणी शहराचे कारभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे गुरुवारी (ता.२२) केली.

समस्त पिंपरी-चिंचवडकरच नाही,तर सर्वच राजकीय पक्षांचा या शुल्काला विरोध असल्याचे दिसून आले आहे.त्यात आता सत्ताधारी आमदारांनीच ही मागणी केल्याने जिझीया शास्तीनंतरची ही शुल्क वसुलीही रद्द होण्याची शक्यता वाढली आहे.

महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार वर्षांच्या शास्तीसह उपयोगकर्ता शुल्काची दंडासह वसुली सामान्यांवर अन्यायकारक असल्याने चार वर्षांचा कर आकारणीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी आमदार महेश लांडगे(Mahesh Landge) यांनी आयुक्तांबरोबरच्या बैठकीत केली. प्रशासनाने नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा,प्रशासनाच्या चुकीचा निर्णय नागरिकांच्या माथी मारु नये असेही ते म्हणाले.

ज्या हौसिंग सोसायट्या आवारातच कचरा जिरवतात अशा ‘झिरो गार्बेज’ धोरण राबवणाऱ्यांना मिळकतधारकांना कचरा उचलण्यासाठी लागू केलेले शुल्क आकारणी करु नये अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.

या शुल्क आकारणीला स्वंयसेवी संस्था, संघटना, सोसायटी फेडरेशन यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. त्यांची याबाबत महापालिका भवना(Pimpri Chinchwad) मध्ये आयुक्तांबरोबर ही बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना आमदार लांडगे म्हणाले, प्रशासनाने २०१९ पासूनच उपयोगकर्ता शुल्काची वसुली करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शासन निर्णय असतानाही करवसुली(Tax)ची अंमलबजावणी करण्यासाठी दिरंगाई करुन नागरिकांवर दंडाचा बोजा टाकण्याऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरच प्रशासनाने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. उपयोगकर्ता शुल्क व दंडाच्या वसुलीला शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध आहे ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यावी असंही लांडगे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT