Shekhar Singh, Anna Bansode
Shekhar Singh, Anna Bansode Sarkarnama
पिंपरी चिंचवड

NCP vs PCMC Commissioner : प्रशासकांचा एककल्ली कारभार; आमदाराची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार

सरकारनामा ब्युरो

Pimpri-Chinchwad NCP : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दीडशे कोटी रुपयांच्या जॅकवेल निविदेवरील आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावून त्यात खरे आढळले तर ही निविदा रद्द करण्याची मागणी पिंपरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी रविवारी (ता. २) पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे केली होती. त्यानंतर सोमवारी (ता. ३) त्यांनी आयुक्तांच्या एककल्ली कारभाराविरोधात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच पत्राव्दारे तक्रार केली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह शहरातील सत्ताधारी आमदार, खासदारांच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत, अशी चर्चा आहे. असे नमूद करीत पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेण्याची प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे काही प्रमाणात शेखरसिंह यांच्या कारभाराविरोधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्यास अनावश्यक आरोप होणार नाहीत. तसेच, राजकीय आरोपांमुळे शहराच्या लौकीकालाही गालबोट लागणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली व सांगण्यानुसार शेखरसिंह आणि पालिका प्रशासन काम करीत असल्याचा आरोप यापूर्वीच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे. तसेच आयुक्त दालनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनही केले आहे.

गव्हाणे यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेत निकष्ट काम केले म्हणून गोंडवाना कंपनीची मान्यता मध्यप्रदेश सरकारने रद्द केली. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर महापालिकेत वेळेत काम पूर्ण केले नाही, म्हणून या कंपनीचे काम काढून घेत सुरक्षा ठेव जप्त केली. असे असतानाही पिंपरीत या कंपनीला काम दिलेच कसे, अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळे या कामाच्या मंजुरीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT