Pimpri Chinchwad NCP 
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad NCP: "लाडकी बहीण म्हणता अन् त्यांचीच इज्जत ठेवत नाहीत"; राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरुन पुण्यात महिलांचा राडा

Pimpri Chinchwad NCP: आम्हाला आमच्या प्रभागात स्थानिक कष्टकऱ्यांचा उमेदवार पाहिजे, आमदार पुत्राची उमेदवारी नको अशी मागणी या महिलांनी अजित पवारांसमोर केली आहे.

Amit Ujagare

Pimpri Chinchwad NCP: महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्याचा काम सुरु आहे. यामध्ये उमेदवारी, प्रचार या बाबींचा समावेश आहे. यानिमित्तानं पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून बारामती हॉस्टेल इथं ठाण मांडून आहेत. याच ठिकाणी महापालिकांची जबाबदारी सोपवलेल्या नेत्यांच्या बैठकाही होत आहेत. याच बारामती होस्टेलमध्ये आज काही महिलांच्या गटानं अजित पवारांसमोर चांगलाच गोंधळ घातला.

आमदार पुत्राच्या उमेदवारीला विरोध करताना या महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. आम्हाला लाडकी बहीण म्हणता आणि या लाडक्या बहिणींचीच इज्जत ठेवत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता अजित पवार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्यावर टीकाही केली.

नेमकं काय घडलं?

आज बारामती होस्टेल इथं अजित पवार आणि आण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी नगरसेवकपदाच्या उमेदवाऱ्यांबाबत चर्चा सुरु होती. यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या काही कष्टकरी महिलांचा गट या ठिकाणी अजित पवारांची भेट घेण्यासाठी आला होता. या महिलांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये आम्हाला स्थानिक, कष्टकऱ्यांचा उमेदवार पाहिजे अशी मागणी लावून धरली. तसंच आण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्या मुलाला आमच्या प्रभागातून उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीवरुन बारामती हॉस्टेल इथं अजित पवारांसमोरच या महिलांसोबत वादावादी झाली. यावेळी आमचं म्हणणं देखील ऐकूण घेतलं गेलं नाही, असा आरोप या महिलांनी केला.

बारामती हॉस्टेल बाहेर काही पत्रकारांसमोर आपलं म्हणणं मांडताना या महिला म्हणाल्या की, आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आहे, कष्टकऱ्यांचा उमेदवार पाहिजे आहे. आम्हाला आमदार पुत्र इथं नको. आम्हाला काम करणारा तळागाळातला खरा कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहिजे. लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणींची इज्जत ठेवत नाहीत. दोन मिनिटं आमचं ऐकूनही घेत नाहीत, आम्ही तळतळून जीव तोडून आलो आहोत. दोन मिनिटं आमचं ऐकूनही घेत नाहीत, आम्हाला म्हणतात की तुम्ही राजकारण नका शिकवू आम्हाला. आतमध्ये आम्हाला अशा भाषेत सुनावण्यात आलं पण आम्ही कोणाचं नाव घेणार नाही. आमचं दादांना एवढंच म्हणणं होतं की, आम्हाला उमेदवारी द्या. आमदार पुत्राला जर तुम्हाला उमेदवारी द्यायची असेल तर पुढच्या वॉर्डमध्ये द्या. वॉर्ड क्रमांक ९ मध्ये या आमदार पुत्राला येण्याची काहीच गरज नाही. आम्ही कोणाचेही नावं घेत नाही, आतमध्ये आमचा अपमान झालेला आहे"

आमदार पुत्र म्हणजे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी वॉर्ड क्रमांक ९ मधून उमेदवारी देण्याची सध्या चर्चा सुरु आहे. या प्रभागाची व्याप्ती टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, पंतप्रधान आवास योजना, अंतरिक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तूउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरुनगर, महिंद्रा अँन्थिया हौसिंग सोसायटी या भागांपर्यंत आहे.

दरम्यान, सिद्धार्थ बनसोडेच्या उमेदवारीला विरोध करताना आक्रमक झालेल्या महिलांबाबत बारामती होस्टेलमध्ये नेमकं काय घडलं? यावर आण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, "उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला नाही याचा सर्वस्वी अधिकार हा अजितदादांना आहे. आत्तापर्यंत दादांनी पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये कोणाचीही नावं जाहीर केलेली नाहीत. दोन तीन दिवसात ते नावं जाहीर करतील. त्यामुळं कोणीही हे समजू नये की, आपली उमेदवारी निश्चित झालेली आहे. या महिला बारामती होस्टेलवर आल्या तेव्हा मी आत होतो, दादा आत होते, ते आले दादांना विनंती केली दादा म्हणाले, तीन चार वेळा तुमच्या लोकांची विनंती झालेली आहे. त्यामुळं त्यांचा अपमान करण्याचं कारण नाही"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT