Bullock cart race    

 

sarkarnama

पिंपरी चिंचवड

सांगलीत कोरोना नाही का, पुणे जिल्ह्यातून होतेय विचारणा

सांगली जिल्ह्यात कोरोना नाही का, तिथे ही गर्दी झाल्याने तो होणार नाही का अशी विचारणा यामुळे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक व शौकीन करू लागले आहेत.

उत्तम कुटे

पिंपरी : गेले काही वर्षे बंद असलेली राज्यातील बैलगाडा शर्यत (Bullock cart race) पुन्हा तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यास सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्याच्या १६ तारखेला दिली. त्यानंतर पुणे (Pune) जिल्ह्यात पहिल्या बैलगाडा शर्यतीचा धुरळा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच (ता. १) उडणार होता.

शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील हे आपल्या गावी (लांडेवाडी,ता. आंबेगाव), तर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे मावळ तालुक्यात नाणोली येथे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थित ही शर्यत घेणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी ३१ डिसेबरच्या रात्री या शर्यतीला अगोदर दिलेली परवानगी काही तास अगोदर वाढत्या कोरोनाचे कारण देत स्थगित केली गेली.

दुसरीकडे तिचा धुरळा सांगली जिल्ह्यात नांगोळे (ता. कवळे महांकाळ) येथे मंगळवारी (ता.४) उडाला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या शर्यतींना परवानगी नाकारण्यामागे राजकारण होते, या आढळरावांच्या आरोपाला पुष्टी मिळाली. सांगली जिल्ह्यात कोरोना नाही का, तिथे ही गर्दी झाल्याने तो होणार नाही का अशी विचारणा यामुळे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक व शौकीन करू लागले आहेत.

आढळराव यांनी सोमवारी (ता. ३) यासंदर्भात ट्विट करीत बैलगाडा शर्यतीबद्दल पाणी मुरतंय कुठं अशी शंकावजा विचारणा केली होती. सांगली जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ३१ डिसेंबरला नांगोळे येथील बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. मात्र, त्याच दिवशी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काही दिवस अगोदर दिलेली ही परवानगी, मात्र स्थगित केल्याने आढळरावांनी त्याबद्दल आश्चर्य आणि संशयही व्यक्त केला होता.

कोरोना असो वा नसो सांगली जिल्ह्यात या शर्यतीला परवानगी आणि दुसरीकडे पुणे जिल्ह्यात दिलेली परवानगी मागे घेणे म्हणजे यात नक्की पाणी मुरतंय, हे तुम्हीच ठरवा, शेतकरी बंधूनो,असे नेमकं, सूचक ट्विट आढळरावांनी केलं होतं. आपला संशय चुकीचा नव्हता. हे सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सिद्ध झाल्याचे त्यांनी त्यात म्हटलं आहे. परवानगी नाकारताच दुसऱ्याच दिवशी (ता. १) त्यांनी त्यामागे पुणे जिल्ह्यातील आपले राजकीय विरोधक असल्याचा दावा केला होता. कारण जिल्ह्यात होणारी सर्वात मोठी ही शर्यत त्यांना खुपली होती, असे ते म्हणाले होते.

राज्य सरकारने थर्टी फर्स्टला कोरोना निर्बंध आणखी कडक केले. फक्त पन्नासच्या कमाल उपस्थितीचे बंधन टाकण्यात आले. त्यातूनच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही शर्यत परवानगी पुढील आदेशापर्यंत ३१ तारखेला स्थगित केली. त्यावर आढळरावांनी संताप व्यक्त केला. तर, आमदार शेळकेंनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले होते. दरम्यान, ती खेड तालुक्यात बंदी झुगारून २ जानेवारीला घेण्यात आली. तर, भविष्यात पुन्हा हा धुरळा उडविणार असल्याचे आमदार शेळके यांनीही सांगितले आहे. मात्र, हेच निर्बंध असताना सांगलीत ही शर्यत कशी झाली, याबद्दल पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक आणि शौकीन विचारणा करू लागले असून ते संतापही व्यक्त करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT