Pimpri-Chinchwad NCP : कोट्यवधी रुपये घोटाळ्याच्या आरोपाची जॅकवेल निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या दालनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसने आज जोरदार निदर्शने केली. तसेच ही निविदा रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शेखरसिंह हे आयुक्त नसून भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसने केला.
PCMC जॅकवेल बांधणीचे हे काम वादग्रस्त गोंडवाना कंपनीला न देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने केली होती. मात्र, शेखर सिंह (Shekhar Singh) हे स्थानिक भाजप नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यातूनच त्यांनी ते काम गोंडवाना कंपनीलाच दिले,असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांनी आंदोलनानंतर केला. शेखर सिंह हे आय़ुक्त नसून भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे कामकाज करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढविला.
मुख्यमंत्री पेयजल योजनेत निकष्ट काम केले म्हणून गोंडवाना कंपनीची मान्यता मध्यप्रदेश सरकारने रद्द केली. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर महापालिकेत वेळेत काम पूर्ण केले नाही, म्हणून या कंपनीचे काम काढून घेत सुरक्षा ठेव जप्त केली. असे असतानाही पिंपरीत या कंपनीला काम दिलेच कसे, अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळे या कामाच्या मंजुरीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्वाची माहिती दडवल्याचा आरोप असूनही गोंडवाना ठेकेदार कंपनीलाच १७६ कोटी रुपयांचे जॅकवेल बांधणीचे काम देण्यात आल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीने आयुक्त कार्यालयाबाहेर गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यात पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.